प्राधिकरणाचा खर्चच दुप्पट
By Admin | Updated: March 10, 2017 01:10 IST2017-03-10T01:10:08+5:302017-03-10T01:10:08+5:30
जीवन प्राधिकरणाच्या उत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाची हमी आता शासनाने घ्यावी,

प्राधिकरणाचा खर्चच दुप्पट
कर्मचारी संपावर : वेतनाची हमी शासनाने घ्यावी
यवतमाळ : जीवन प्राधिकरणाच्या उत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाची हमी आता शासनाने घ्यावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला. येथील कर्मचाऱ्यांनीही त्यात सहभाग घेऊन धरणे आंदोलन सुरू केले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीतर्फे हे आंदोलन सुरू करण्यात आले. कर्मचारी संपावर असले, तरी शहराचा पाणीपुरवठा मात्र सुरळीत सुरू ठेवण्यात येईल. केवळ कार्यालयीन कामकाजात कर्मचारी सहकार्य करणार नाही, असे आंदोलकांनी सांगितले.
प्राधिकरणात कार्यरत व सेवानिवृत्तांचे वेतन जीवन प्राधिकरणाच्या उत्पन्नातूनच अदा केले जाते. या उत्पन्नात पाणीपट्टी, तांत्रिक मान्यता शुल्क व भांडवली कामे करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा समावेश आहे. भांडवली कामांसाठी सुरुवातीला प्राधिकरणाला १७.५ टक्के शुल्क मिळत होते. ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीनंतर हे शुल्क कमी होत तीन टक्क्यापर्यंत घसरले. या घटना दुरुस्तीमुळे बरीचशी कामे प्राधिकरणाकडून करवून न घेता स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत करण्यात येते. पाणीपट्टी वसुलीपोटी मिळणारे उत्पन्नही अतिशय कमी आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जीवन प्राधिकरणाचे ३५०० कोटी थकबाकी आहे. आजघडीला प्राधिकरणाचे उत्पन्न सरासरी वार्षिक १३५ कोटीपर्यंत आहे. खर्च मात्र सरासरी वार्षिक ४५० कोटी आहे. यात कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वेतन व इतर आनुषंगिक भत्ते, प्राधिकरणाच्या विविध योजनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च समाविष्ट आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या स्वउत्पन्नातून खर्च भागविणे अशक्य होत आहे. याकरिता कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांची हमी शासनाने घ्यावी म्हणून विविध संघटनांनी डिसेंबर २०१५ मध्ये आंदोलन केले. त्यावेळी ३ महिन्यात वेतनाचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र अद्याप कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)