एकरी खर्च १२ हजार, उत्पन्न ११ हजार
By Admin | Updated: October 14, 2015 02:59 IST2015-10-14T02:59:04+5:302015-10-14T02:59:04+5:30
मराठवाड्यातील भीषण दुष्काळाची छाया उमरखेड तालुक्यावरही सुरुवातीपासूनच होती. अपुऱ्या पावसाने संपूर्ण खरीप उद्ध्वस्त झाला ...

एकरी खर्च १२ हजार, उत्पन्न ११ हजार
सोयाबीन बुडाले : मुळावा परिसरात सोयाबीनचा उतारा सरासरी केवळ तीन क्ंिवटल
दिनेश चौतमाल मुळावा
मराठवाड्यातील भीषण दुष्काळाची छाया उमरखेड तालुक्यावरही सुरुवातीपासूनच होती. अपुऱ्या पावसाने संपूर्ण खरीप उद्ध्वस्त झाला असून आता सोयाबीन काढणीच्या वेळी तर शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. सोयाबीनच्या एका एकराला १२ हजार रुपये खर्च आला तर सरासरी उतारा तीन क्ंिवटल येत असल्याने ११ हजार रुपयेही हातात येत नाही. एक ते दीड हजार रुपयांचा एकरी घाटा सोयाबीनमुळे सहन करावा लागत आहे. या परिस्थितीने शेतकरी पुरते हवालदिल झाले आहे.
मराठवाड्यालगतच्या उमरखेड, पुसद आणि महागाव या तालुक्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण होते. त्यामुळे पिकांची योग्य वाढ झाली नाही. महिना महिना पावसाने दडी मारल्याने पोषक वातावरणच निर्माण झाले नाही. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी पिकांना जगविण्याचा प्रयत्न केला. मात्र आता हाती सोयाबीन आल्यावर त्यांचा भ्रमनिरास होत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे लागवड करण्यात आली होती. परंतु पेरणीनंतर शेंगा भरणीच्या काळात पाऊसच झाला नाही. त्यामुळे सोयाबीनचे दाणे ज्वारी सारखे बारीक झाले. त्यानंतर पाऊस झाला परंतु या पावसाचा फायदा होण्याऐवजी नुकसानच झाले. वाळलेल्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब आले. यात सुमारे २५ टक्के नुकसान झाले.
आता सोयाबीन काढणीला प्रारंभ झाला आहे. सोंगणीचे दर आकाशा भिडले आहे. गतवर्षी १३०० रुपये सोंगणीचे दर आता १७०० रुपयावर गेले आहे. हार्वेस्टर काढणीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीन ठेकेदारी पद्धतीने मळणी यंत्रणातून काढली जात आहे. मळणी यंत्राला प्रति क्ंिवटल ४०० ते ५०० रुपये द्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या हाती केवळ दोन ते तीन क्ंिवटल सोयाबीन येत आहे. यामुळे उत्पन्नातून खर्च वजा जाता एक ते दीड हजार रुपयेही उरत नसल्याचे दिसून येते.
सोयाबीनच्या कमी उताऱ्याचा शोध घेण्यास कृषी विभागाला अपयश आले. खोड किड, मोझॅक की अपुरा पाऊस हे कुणीही नेमके सांगत नाही. गेल्या २० ते २५ वर्षांपासून सोयाबीन सलगपणे घेतले जाते. त्याचा तर हा परिणाम नसावा ना अशी शंकाही शेतकरी घेऊ लागले आहे. सोयाबीनला भरपूर शेंगा लागल्या. परंतु त्यात दाणे भरले नाही. आता बँकांचे आणि सावकाराचे कर्ज कसे फेडावे, अशी विवंचना शेतकऱ्यांंना लागली असून सोयाबीनने अक्षरश: बुडविल्याचे शेतकरी सांगत आहे.