पेयजल योजनेत भ्रष्टाचार
By Admin | Updated: February 4, 2015 23:23 IST2015-02-04T23:23:35+5:302015-02-04T23:23:35+5:30
तालुक्यातील निंबी येथे राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर असून या योजनेच्या कामात तब्बल नऊ लाख रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे. या भ्रष्टाचाराला पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष,

पेयजल योजनेत भ्रष्टाचार
पुसद : तालुक्यातील निंबी येथे राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर असून या योजनेच्या कामात तब्बल नऊ लाख रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे. या भ्रष्टाचाराला पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, सचिव, सरपंच व ग्रामसेवक हे जबाबदार असून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी समितीच्या १२ सदस्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पुसद तालुक्यातील निंबी येथे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली. यासाठी गावातील तब्बल १४ सदस्यांची पाणीपुरवठा समिती स्थापन करण्यात आली आहे. या योजनेतील तब्बल नऊ लाख रुपये समितीचे अध्यक्ष व सचिवांनी परस्पररीत्या खात्यातून काढून अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पाणीपुरवठा समितीची एकही सभा या दरम्यान घेण्यात आलेली नसून सदर योजनेच्या कामाचे कंत्राट कुणाला दिले, आतापर्यंत किती खर्च झाला याबाबत समितीच्या सदस्यांना काहीही माहिती देण्यात आली नाही. अध्यक्ष व सचिव हेच परस्पर कामे करीत असून समिती सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोपही तक्रारीतून करण्यात आला आहे. या योजनेमध्ये समितीच्या अध्यक्ष, सचिव, सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून गैरव्यवहार केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी व सदर कामाची त्वरित चौकशी करावी, अन्यथा गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यासंबंधी केलेल्या तक्रारीवर पाणीपुरवठा समिती सदस्य विजय चव्हाण, दिगांबर चव्हाण, प्रकाश चव्हाण, अनुसया बोके, छाया वंजारे, शोभा राठोड, पांडुरंग काळे, बेबी जाधव, बबन धुळधुळे, वंदना बाभणे, संजीवनी सोनटक्के, बळीराम वंजारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. याबाबत समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होवू शकले नाही. (प्रतिनिधी)