नगरसेवकांची हुरहूर थांबली

By Admin | Updated: October 20, 2016 01:32 IST2016-10-20T01:32:45+5:302016-10-20T01:32:45+5:30

विधान परिषदेत मतदानाची संधी मिळणार की नाही, ‘लक्ष्मी’ दर्शन चुकणार तर नाही, अशी हुरहूर बाळगणारे मावळते नगरसेवक आता ‘रिलॅक्स’ झाले आहेत.

The corporators stopped hurling | नगरसेवकांची हुरहूर थांबली

नगरसेवकांची हुरहूर थांबली

नगरपरिषदांपूर्वी विधान परिषद : १९ नोव्हेंबरला मतदान, २१ ला मतमोजणी
यवतमाळ : विधान परिषदेत मतदानाची संधी मिळणार की नाही, ‘लक्ष्मी’ दर्शन चुकणार तर नाही, अशी हुरहूर बाळगणारे मावळते नगरसेवक आता ‘रिलॅक्स’ झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्याने त्यांची हुरहूर थांबली आहे. कित्येक जण तर केवळ घोषणेनेच जणू कोमातून बाहेर आले.
विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने बुधवारी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली. २२ नोव्हेंबर रोजी त्याची मतमोजणी होणार आहे. या घोषणेने नगरपरिषदांच्या सर्वच सदस्यांना ‘हायसे’ वाटले आहे. तर नगरपरिषद निवडणुकांची घोषणा झाल्याने आनंदात असलेल्या संभाव्य नगरसेवकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. नव्या सदस्यांनाच संधी मिळणार, असे दाव्याने सांगून विविध कायदेशीर दाखले व तांत्रिक अडचणी सांगणाऱ्या सदस्यांचे तर आर्थिक गणितच चुकले आहे. निवडणुकीत होणाऱ्या खर्चाची विधान परिषदेत ‘भरपाई’ होणार या आशेने संभाव्य इच्छुक चांगलेच सुखावले होते. मात्र निवडणूक आयोगाने बुधवारी विधान परिषद निवडणुकीची घोषणा करून या इच्छुकांच्या स्वप्नांचा चांगलाच चुराडा केला. त्यांचे नगरसेवक म्हणून निवडून येताच ‘लक्ष्मी’ दर्शनाचे स्वप्न भंगले. मावळत्या नगरसेवकांच्या उत्साहाला तर आता पारावार राहिलेला नाही. कारण नगरपरिषद निवडणुकांची घोषणा झाल्यापासून या नगरसेवकांचे चेहरे अक्षरश: कोमेजले होते. मात्र बुधवारच्या घोषणेने हेच चेहरे प्रफुल्लीत आणि ताजेतवाणे झाल्याचा बदल पहायला मिळाला.
जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांसाठी तसेच थेट नगराध्यक्ष पदासाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आता त्यापूर्वी १९ नोव्हेंबर रोजी विधान परिषदेसाठी मतदान घेतले जाणार आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप बाजोरीया या जागेचे प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यांना राष्ट्रवादीकडून दुसऱ्यांदा संधी मिळते का याकडे राजकीय क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत. कारण त्यांच्यापुढे घरातूनच आव्हान उभे झाले आहे. राष्ट्रवादी लढणार का, काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होणार का ?, युती झाल्यास दावा कुणाचा, उमेदवार कोण, उमेदवारांची वाणवा असलेल्या शिवसेना-भाजपाची काय भूमिका राहणार, ते युतीत लढणार की कुणाला पाठिंबा देणार अशा विविध प्रश्नांवर चर्चेचे फड रंगायला पुन्हा सुरूवात झाली आहे. नगरपरिषद निवडणुकांच्या घोषणेमुळे उपरोक्त चर्चा काहींशा थांबल्या होत्या. परंतु आता पुन्हा राजकीय तर्क सुरू झाले आहे. या विधान परिषदेवर आगामी नगरपरिषद निवडणुकीतील खर्चाचे गणित अवलंबून आहे. पुढील पंचवार्षिकमध्ये निवडून येणाऱ्यांना विधान परिषदेत मतदानाची संधी मिळणार नाही. त्यामुळे अनेकांनी पुन्हा निवडणुक लढविण्याचा नादही सोडला आहे. त्यांची ही भूमिका पाहता विधान परिषदेत मोठ्या प्रमाणात पक्षादेश झुगारला जाण्याची, पक्ष विरोधी कामकाज होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The corporators stopped hurling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.