नगरसेवकावर फसवणुकीचा गुन्हा
By Admin | Updated: June 5, 2017 01:17 IST2017-06-05T01:17:18+5:302017-06-05T01:17:18+5:30
कमी पैशात सोने देण्याची बतावणी करणाऱ्या येथील काँग्रेस नगरसेवकासह दोघांवर यवतमाळ शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

नगरसेवकावर फसवणुकीचा गुन्हा
एकास अटक : बनावट सोने, तीन लाख लाटले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कमी पैशात सोने देण्याची बतावणी करणाऱ्या येथील काँग्रेस नगरसेवकासह दोघांवर यवतमाळ शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे. या दोघांनी दारव्हा येथील व्यापाऱ्याला बनावट सोने देऊन तीन लाखांने गंडा घातल्याचा आरोप आहे.
येथील काँग्रेसचे नगरसेवक सलीम सागवान व मो. नईम मो. फकरुला (४४) दोघे रा. यवतमाळ असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या दोघांनी दारव्हा येथील युवक गणेश माधवराव भवर (३४) याला सहा लाखांत एक किलो सोने विकायचे असल्याची बतावणी केली. कमी पैशात सोने मिळत असल्याने गणेश त्यांच्या जाळ्यात अडकला. या सोने खरेदीचा व्यवहार ठरल्यानंतर २५ मे रोजी दुपारी १ वाजता आरोपींनी आरटीओ कार्यालयाजवळ गणेशला बोलाविले. तिथे ठरल्याप्रमाणे सहा लाखांपैकी तीन लाख रुपये रोख देण्यात आले. नंतर आरोपींनी गणेशला नगरपरिषद कार्यालयाजवळ बोलाविले. तेथे तीन लाखांच्या मोबदल्यात अर्ध्या किलो सोने दिले.
मात्र गणेशला या सोन्याबद्दल संशय आला. त्याने या सोन्याची तपासणी केली. मात्र ते सोने बनावट असल्याचे आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शनिवारी गणेश भवर याने यवतमाळ शहर ठाणे गाठले. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी रात्री १२ वाजता गुन्हा दाखल केला. त्यानंतर याप्रकरणातील आरोपी मो.नईम मो. फकरुला याला त्याच्या घरुन अटक करण्यात आली. तर यातील मुख्य आरोपी नगरसेवक सलीम सागवान पसार असल्याचे सांगण्यात आले. यवतमाळ शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. यापूर्वीसुद्धा नगरसेवक सलीम सागवान यांच्यावर विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहे. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात कमी किंमतीत सोने विकण्याचे प्रकार यापूर्वीही उघडकीस आले असून त्या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहे.