पुसदमध्ये कोरोना विषाणूचे तांडव, आतापर्यंत चार जणांचे गेले बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:00:18+5:30
सुरुवातीला बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव केला. त्यावर नियंत्रण मिळवत असतानाच शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

पुसदमध्ये कोरोना विषाणूचे तांडव, आतापर्यंत चार जणांचे गेले बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरात कोरोनाचे तांडव सुरू झाले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत कोरोनाने चार जणांचे बळी घेतले आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातच दहशत निर्माण झाली आहे.
सुरुवातीला बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव केला. त्यावर नियंत्रण मिळवत असतानाच शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शनिवारी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सध्या ३७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून एकूण कोरोना बाधितांची संख्या ५५ झाली. यात गढी वॉर्डातील ६० वर्षीय चालक, पार्वतीनगरमधील ७० वर्षीय सेवानिवृत्त लाईनमन, मोतीनगरमधील ७० वर्षीय सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक आणि आता जांबबाजार येथील शाळेवर कार्यरत एका शिक्षकाचा बळी गेला. चार जणांचे बळी गेल्याने शहरामध्ये भीती निर्माण झाली आहे.
शहरातील काही भाग प्रतिबंधित करण्यात आले आहे. जवळपास १०० नागरिक आसारपेंड व आयुर्वेद महाविद्यालयाच्या सेंटरमध्ये क्वारंटाईन आहे. यापैकी २६ जणांचे स्वॅब शनिवारी यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर आतापर्यंत १४ जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. मात्र दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत असल्याने प्रशासनासह नागरिकही चिंतेत आहे. तथापि, अनेक नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करीत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दुपारी २ वाजतानंतरही शहरातील काही परिसर गर्दीने फुलून गेल्याचे दिसते. प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.
२४ तासांत दोन भावांचा मृत्यू
वसंतनगर परिसरातील दोन भावांचा अवघ्या २४ तासांच्या अंतरात मृत्यू झाला. ४८ वर्षीय इसम टायफाईडच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना उपचारासाठी १६ जुलै रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास यवतमाळला रवाना केले. मात्र वाटेत दिग्रसजवळ त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला २४ तास लोटत नाही तोच १७ जुलै रोजी त्यांचे शिक्षक असलेले ४४ वर्षीय बंधू कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. सदर शिक्षकाचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. अवघ्या २४ तासांच्या अंतरात दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूने वसंतनगरवर शोककळा पसरली आहे.