पुसदच्या कोविड सेंटरमधील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:00:15+5:30
शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. आयुर्वेद महाविद्यालयाच्या डीसीएचसी सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांसाठी डॉक्टर व इतर यंत्रणा कार्यरत आहे. त्यापैकी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब शनिवारी उघडकीस आली. एकूण पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात या दोन डॉक्टरांसह एक तरुण व एका महिलेचा समावेश आहे.

पुसदच्या कोविड सेंटरमधील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोना
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच असून शनिवारी दुपारपर्यंत नवीन पाच रुग्णांची भर पडली. यात खुद्द आयुर्वेद महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमधील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या संपर्कातील तहसीलदारांसह १८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. आयुर्वेद महाविद्यालयाच्या डीसीएचसी सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांसाठी डॉक्टर व इतर यंत्रणा कार्यरत आहे. त्यापैकी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब शनिवारी उघडकीस आली. एकूण पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात या दोन डॉक्टरांसह एक तरुण व एका महिलेचा समावेश आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे एकूण अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ६७ वर पोहोचली आहे. तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ११० झाला आहे. सध्या शहरात १९९ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात येथील तहसीलदारांसह १८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या क्वारंटाईन नागरिकांमुळे पुसदचे कोविड सेंटर हाऊसफुल्ल झाले आहे.
कोरोनाची लागण झालेले दोन्ही डॉक्टर येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहे. ते सध्या डीसीएचसी सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करीत होते. त्यांची रॅपिड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य व महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दोन डॉक्टर, तरुण व वसंतनगरमधील मायलेकाचा अहवालसुद्धा पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली. तहसीलदार व तहसील कार्यालयातील १८ जणांना येथील दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विश्रामगृहात क्वारंटाईन करण्यात आले. त्यांचे स्वॅब नमुने शनिवारी घेतले जाणार आहे.
९२ जणांचे अहवाल अप्राप्त
गेल्या २१ जुलैपासून आजपर्यंत पाठविलेल्यांपैकी ९२ जणांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहे. १९९ नागरिक क्वारंटाईन आहे. आतापर्यंत पाच बळी गेले. ४७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर डीसीएचसी सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याचे डॉ.हरीभाऊ फुपाटे यांनी सांगितले. नागरिकांनी लॉकडाऊन नियमांचे पालन करावे, असे आवाहन एसडीओ डॉ.व्यंकट राठोड यांनी केले.