कोरोनाचा झाला उद्रेक, संयमाचा लावला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 05:00 AM2021-04-11T05:00:00+5:302021-04-11T05:00:02+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता, जिल्हा प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत बाजारपेठेवर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यातच शुक्रवारी रात्री ८ पासून सोमवारी सकाळी ७ पर्यंत संपूर्ण संचारबंदीचे आदेश आहेत. परंतु, जिल्हाभरात लाॅकडाऊन नको म्हणून प्रशासनाकडे निवेदनांचा खच पडत आहे. असे असताना शनिवार व रविवारी संपूर्ण संचारबंदीला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो की नाही, याबाबत साशंकता होती.

Corona had an outburst, a break of restraint | कोरोनाचा झाला उद्रेक, संयमाचा लावला ब्रेक

कोरोनाचा झाला उद्रेक, संयमाचा लावला ब्रेक

Next
ठळक मुद्देलाॅकडाऊनला स्वयंस्फूर्त प्रतिसाद : बाजारपेठ बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, हे अपघात टाळणारे ब्रीदवाक्य कोरोनाची साखळी तोडण्यासाठीही प्रभावी असल्याचे नागरिकांनी आता ओळखले आहे. त्यामुळेच शनिवारी लाॅकडाऊनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली. विशेष म्हणजे, कुठेही पोलिसांचा ससेमिरा नसतानाही नागरिकांनी स्वत:हून गर्दी टाळत प्रशासनाच्या कर्फ्यूला जनता कर्फ्यूचे रूप दिल्याची प्रचिती आली. 
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता, जिल्हा प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत बाजारपेठेवर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यातच शुक्रवारी रात्री ८ पासून सोमवारी सकाळी ७ पर्यंत संपूर्ण संचारबंदीचे आदेश आहेत. परंतु, जिल्हाभरात लाॅकडाऊन नको म्हणून प्रशासनाकडे निवेदनांचा खच पडत आहे. असे असताना शनिवार व रविवारी संपूर्ण संचारबंदीला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो की नाही, याबाबत साशंकता होती. प्रत्यक्षात ही शंका खोटी ठरवित नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोर पालन केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अटकाव करण्यासाठी कुठेही पोलीस बंदोबस्त दिसून आला नाही. तरीही संचारबंदीचे उल्लंघन झाले नाही, हे विशेष. 
शुक्रवारी रात्री ८ वाजता बाजारपेठ बंद झाल्यावर ती थेट सोमवारीच उघडली जाणार, हे माहीत असूनही नागरिकांनी शुक्रवारीही दुकानांमध्ये गर्दी केली नाही. कोरोनाला रोखायचे असेल, तर प्रत्येकाने थोडी कळ सोसलीच पाहिजे, हे सामंजस्य यवतमाळकरांनी दाखविल्याने प्रशासनालाही दिलासा मिळाला. शनिवारी बसस्थानक चौक, नेताजी मार्केट, दत्त चौक, आर्णी रोड, गोधणी रोड, दाते काॅलेज चौक, बाजार समिती चौक, पोस्ट ऑफिस चौक, तिरंगा चौक, एसबीआय चौक, सिव्हिल लाइन आदी नेहमी गजबजणारे परिसर शनिवारी दिवसभ चिडीचूप होते. अत्यावश्यक कामासाठी आलेल्या मोजक्या माणसांशिवाय रस्त्यावर चिटपाखरूही फिरकले नाही. आता हाच संयम नागरिकांनी रविवारीही दाखविण्याची गरज आहे, शिवाय दोन दिवसांच्या बंदनंतर सोमवारी सकाळी काही दुकाने उघडताच एकदम गर्दी होणार नाही, याचीही काळजी घेण्याची गरज आहे.
संचारबंदीतही अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने आणि दूध विक्रीला मुभा देण्यात आली आहे. मात्र शनिवारी संभ्रमातून या दुकानदारांनीही दुकाने उघडली नाही. मात्र नागरिकांच्या सोईसाठी त्यांना रविवारी दुकाने उघडता येणार आहे. 
 

इतरांसोबत अत्यावश्यक सेवेचीही दुकाने बंद
 शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत ६० तासांची संचारबंदी जाहीर करताना जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवांना सूट दिली होती. अत्यावश्यक सेवांची दुकाने या संचारबंदीतही सुरू ठेवणे शक्य होते. मात्र अनेक दुकानदारांनी शनिवारी अत्यावश्यक सेवा असूनही दुकाने बंद ठेवल्याचे दिसून आले. पेट्रोल पंप, मेडिकल स्टोअर्स, दवाखाने या सेवा वगळता इतर दुकाने शनिवारी बंद होती. दूधविक्रेते, फळविक्रेते यांचा समावेश प्रशासनाने अत्यावश्यक सेवांमध्ये केला आहे. तरीही ही दुकाने बंद होती. ग्राहकांनाच फिरण्यासाठी बंदी आहे, तर दुकाने सुरू ठेवून करायचे काय, असा सवाल या व्यावसायिकांनी उपस्थित केला.

जिल्ह्यात बस वाहतूक सुरळीत सुरू होती
 एकीकडे संचारबंदी असतानाही सार्वजनिक वाहतूक मात्र सुरू होती. परिवहन महामंडळाच्या ग्रामीण बसफेऱ्या नियोजित वेळेनुसार दिवसभर धावल्या. विशेष म्हणजे, या गाड्या भरूनही गेल्या. त्यामुळे संचारबंदी असतानाही प्रवासी नेमके कोणत्या कारणासाठी जात-येत होते, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, ग्रामीण भागातून यवतमाळात येणारे बहुतांश प्रवासी हे दवाखान्याच्या कारणासाठी आले होते, तर यवतमाळातील अनेक प्रवासी दोन दिवसांची सुटी मूळ गावी घालविण्यासाठी खेड्याकडे निघाल्याचे स्पष्ट झाले. 
 

 बायपास मार्गावर कुठेही ‘अडवणूक’ नाही
 यवतमाळ शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास मार्गावर सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत सुरू होती. जड वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित विचारपूस वगळता, पोलिसांकडून इतर कोणत्याही वाहनांची ‘अडवणूक’ केली गेली नाही. संचारबंदीच्या नावाखाली कोणत्याही दुचाकी चालकाला अडविण्यात आले नाही. पांढरकवडा मार्गावरील चौकी, लोहारा परिसर येथे वळण मार्गावर मुक्त संचार सुरू होता. 

  संध्याकाळी मात्र मुक्त संचार !  
दिवसभर नागरिकांनी संचारबंदीचे तंतोतंत पालन केले. मात्र, संध्याकाळ होताच अनेकांनी घराबाहेर पाऊल टाकले. त्यामुळे दिवसभराच्या संचारबंदीला नागरिकांच्या संयमासोबतच सूर्याचा कोपही कारणीभूत ठरला. सायंकाळ होताच अनेक चहा टपऱ्याही उघडल्या अन् अनेक शौकिनांनी घोटही घेतला. शहराच्या अंतर्गत भागात तर सायंकाळी तरुणांनी चक्क गल्ली क्रिकेटचा आनंदही लुटला.

 

Web Title: Corona had an outburst, a break of restraint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.