जलयुक्तच्या कामांत समन्वय ठेवा
By Admin | Updated: December 7, 2015 06:10 IST2015-12-07T06:10:58+5:302015-12-07T06:10:58+5:30
जलयुक्त शिवार अभियान अतिशय महत्त्वाकांक्षी अभियान आहे. हे अभियान जिल्ह्यात राबविताना संबंधित

जलयुक्तच्या कामांत समन्वय ठेवा
यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियान अतिशय महत्त्वाकांक्षी अभियान आहे. हे अभियान जिल्ह्यात राबविताना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपसात समन्वय ठेवून कामे करणे आवश्यक आहे. नियोजनाप्रमाणे कामे करून मार्च अखेरपूर्वी प्राप्त निधी शंभर टक्के खर्च करावा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेतला. बैठकीला आमदार मनोहर नाईक, आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, अभियान समितीचे तज्ज्ञ सदस्य प्रकाश जानकर, प्रवीण पांडे, राजू देशमुख आदी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात अभियान प्रचंड यशस्वी झाल्याने अनेक गावांकडून अभियान राबविण्याची मागणी होत आहे. सदर अभियान अतिशय उपयुक्त आहे. अभियानातील विविध यंत्रणांनी काम करत असतांना आपसात समन्वय ठेवला पाहिजे. प्रत्येक काम गुणवत्तापूर्वक होणे आवश्यक आहे. एकाच गावात एका बंधाऱ्यावर सलग चार-पाच बंधारे घेतल्यास त्याचे चांगले परिणाम दृष्टीस पडू शकते. त्यामुळे एक-दोन बंधारे न घेता किमान सलग पाच-सहा बंधारे घेण्यात यावे, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४१३ गावांची निवड करण्यात आली. प्रत्यक्षात ३०२ गावांमध्ये कामे होऊ शकली. उर्वरित सर्वच गावांमध्ये मार्चपूर्वी कामे होणे आवश्यक आहे. या गावांमधील प्रस्तावित कामाचे आराखडे तयार करून त्या कामांना तातडीने सुरुवात करावी. शासनाने अभियानासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. पुढेही अभियानास निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे निधीची काळजी न करता यंत्रणेतील सर्वची विभागाने आपसात समन्वय ठेवण्यासोबतच पूर्ण क्षमतेने कामे करावी. मार्च पूर्वी सर्व ४१३ गावांमध्ये चांगल्याप्रकारे कामे होऊन सर्व निधी खर्ची पडला पाहिजे, असे ते म्हणाले. कनिष्ठ अभियंत्यांना प्रत्येकी कामे वाढवून दिल्यास कामे गुणवत्तापूर्वक होईल. जलसंपदा विभागासह अन्य विभागाने कामे वाटून देण्याची सूचनाही त्यांनी केली. जिल्ह्यात आतापर्यंत ३०२ कामे झाली असून कामांची संख्या २५२३ इतकी आहे. तर १६७ कामे प्रगती पथावर आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी कामांची माहिती दिली. (स्थानिक प्रतिनिधी)