सहकारी दूध उत्पादक संस्थांना टाळे
By Admin | Updated: September 29, 2014 23:12 IST2014-09-29T23:12:55+5:302014-09-29T23:12:55+5:30
दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या महागाव तालुक्यासह जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थांना कायमचे टाळे लागले. त्यामुळे आता ग्रामीण भागातही पाकिटाचे दूध शहरातून आणावे लागत असून

सहकारी दूध उत्पादक संस्थांना टाळे
रितेश पुरोहित - महागाव
दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या महागाव तालुक्यासह जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थांना कायमचे टाळे लागले. त्यामुळे आता ग्रामीण भागातही पाकिटाचे दूध शहरातून आणावे लागत असून पॅकेजमधून शेतकऱ्यांना अनुदानावर आलेल्या दुधाळ जनावरांचाही उपयोग शून्य होत आहे. परिणामी दुधाची गरज भागविण्यासाठी खासगी डेअरींवर अवलंबून राहावे लागत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात २५ ते ३० वर्षांपूर्वी दुधाची गंगा वाहात होती. जिल्ह्यात ७१२ दूध उत्पादक सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली होती. त्यातील ४० संस्था महागाव तालुक्यात होत्या. गावागावातून दूध संकलित होऊन शासकीय योजनेला दिले जात होते. शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय असलेल्या दूध उत्पादनातून मोठे पैसे मिळत होते.
मात्र अंतर्गत राजकारण आणि खासगी डेअरींचे चढते भाव यातून सहकारी संस्था डबघाईस आल्या. जिल्ह्यातील ५४ संस्था अवसायनात निघाल्या तर ४४५ संस्था कायमच्या बंद झाल्या आहे. यामुळे यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी आपले दूध खासगी डेअरींना देणे सुरू केले आहे. जिल्ह्याची दुधाची गरज पाच लाख लिटर आणि महागाव तालुक्यातील ३० हजार लिटर दुधाची दररोजची गरज आहे. परंतु एवढे दूध सध्या तालुक्यात निर्माणच होत नाही. त्यामुळे शहरातून येणाऱ्या पाकिटातील दुधावर अवलंबून राहावे लागते.
जिल्ह्यात २ लाख १२ हजार हेक्टर जंगल क्षेत्र असून महागाव तालुक्यात ४० हजार हेक्टरवर जंगल आहे. पाणी, चारा आणि इतर सुविधा सर्व उपलब्ध आहे. अशा स्थितीतही दूध उत्पादन वाढताना दिसत नाही. शेकडोंनी असणारी गावागावातील जनावरेही आता कमी होताना दिसत आहे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे दुधाळ गाई, म्हशी असायच्या.
परंतु चाराटंचाई व इतर कारणांनी जनावरांची संख्या घटत गेली. अनेक शेतकऱ्यांकडे तर नाहीच्या बरोबरीच जनावरे आहेत. त्यामुळे ज्यांच्या घरी दुधाची गंगा वाहात होती त्या शेतकऱ्यांनाही आता पाकिटातून दूध आणावे लागत आहे.