रुपांतरित कर्जाचे वाटप थंडबस्त्यात
By Admin | Updated: July 27, 2014 23:59 IST2014-07-27T23:59:11+5:302014-07-27T23:59:11+5:30
खरीप हंगामात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे जिल्ह्यातील दोन हजार ४७ गावातील पिकाची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी जाहीर करण्यात आली. त्यामुळेच महागाव तालुक्यातील प्राथमिक शेती

रुपांतरित कर्जाचे वाटप थंडबस्त्यात
तीन हजार शेतकरी वंचित : कर्ज सवलतीचा लाभच नाही
महागाव : खरीप हंगामात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे जिल्ह्यातील दोन हजार ४७ गावातील पिकाची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी जाहीर करण्यात आली. त्यामुळेच महागाव तालुक्यातील प्राथमिक शेती सहकारी संस्थेच्या सभासदांना रुपांरित सवलतीचा लाभ देण्याचा निर्णय मध्यवर्ती बँक संचालक मंडळाने घेतला. मात्र तालुक्यात तीन हजार शेतकरी अजूनही या रुपांतरित कर्ज वाटपापासून वंचित आहेत.
तालुक्यातील ज्या गावांमध्ये पिकांची पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा बिगर थकबाकीदार शेतकऱ्यांना मार्च २०१४ मध्ये ३० जून २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अल्पमुदती शेती कर्जाचे रुपांतर मात्र अद्यापही केले नाही. पीक विमा योजनेअंतर्गत प्राप्त नुकसानीच्या रकमा खात्यात जमा झाल्या आहेत. त्या वजा करून राहणाऱ्या कर्जाच्या रकमेचे रुपांतर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अशा रुपांतरित कर्जाच्या हप्त्याचे टप्याटप्याने वाटप करणे आवश्यक आहे. बँकेने या रुपांतरित कर्जाच्या वाटपाला अजूनही सुरुवात केलेली नाही. सोसायटीमध्ये एक आणि राष्ट्रीयकृत बँकांचा वेगळा नियम येथे दिसून येतो. बागायती आणि खरिपाच्या कर्ज वाटपाच्या धोरणाबाबत राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारीही अनभिज्ञ आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही कर्जाच्या रुपांतरित आणि चालू कर्जाचा लाभ मिळालेला नाही. रुपांतरित कर्ज वाटपाची प्रक्रिया बँकेने तातडीने सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
निसर्गाने सातत्याने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. सुरुवातीला अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे खरीप, रबी आणि उन्हाळी पिके नेस्तनाबूत केली. लागवड खर्चही शेतकऱ्यांच्या हाती आला नाही. पिकांसाठी घेतलेले कर्जही परतफेड करणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. या स्थितीत आर्थिक दृष्ट्या फसलेल्या शेतकऱ्यांनी कसेबसे १३-१४ च्या खरीप हंगामाची तयारी सुरू केली. मृगातच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आघात झाला. अतिवृष्टी आणि अवेळी आलेल्या पावसाने चांगल्या दर्जाचे बियाणे निर्माण झाले नाही. अनेक बियाणे कंपन्यांनी वाढीव दराने बियाण्यांची विक्री केली. प्रत्यक्षात मात्र उगवण शक्ती नसल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागला. कंपन्यांचे हे पाप पावसाने दिलेल्या उघाडीमुळे झाकल्या गेले. परिस्थितीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव पदरचा काडीमोड करून पुन्हा खरिपातच दुबार व तिबार पेरणी केली. मुळात बियाणेच बोगस असल्याने उगवण शक्तीचा फटका त्यांना बसलाच आहे. आता अशा स्थितीत शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जाच्या मुदतीत अल्प वाढ केली. त्यानंतर ते कर्ज रुपांतरित करून हप्त्या हप्त्याने शेतकऱ्यांना देण्याचा निर्णयही घेतला. प्रत्यक्षात ही प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे अडचणीच्या काळातही बँकांचे प्रशासन शेतकऱ्यांसाठी तत्पर नसल्याचे दिसून येते. राष्ट्रीयकृत बँका तर शेतकऱ्यांनी आपल्या शाखेकडे फिरकूच नये, अशा अविरभावात वागत असताना दिसून येतात. संकटाने पिसलेल्या शेतकऱ्याला हीन वागणूक मिळत असली तरी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी झालेले सर्व अपमान पचविण्याशिवाय कोणताच पर्याय त्याच्यापुढे आज शिल्लक नाही. (शहर प्रतिनिधी)