मर्जीतील रेती माफियांना सोईस्कर बगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2015 02:35 IST2015-06-13T02:35:18+5:302015-06-13T02:35:18+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी रेती माफियाविरुद्ध फास आवळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मात्र उमरखेड तालुक्यात मर्जीतील रेती माफियांना

मर्जीतील रेती माफियांना सोईस्कर बगल
उमरखेड : जिल्हाधिकाऱ्यांनी रेती माफियाविरुद्ध फास आवळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मात्र उमरखेड तालुक्यात मर्जीतील रेती माफियांना सोईस्कर बगल दिल्या जात असल्याची माहिती आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला महसूल अधिकारीच खो देत आहे.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी रेती साठेबाजांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. आतापर्यंत ८८ साठेबाजांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही बगल देणारी काही महाभाग महसुलात असल्याचे दिसत आहे. ज्या रेती कंत्राटदारांनी आजपर्यंत या कर्मचाऱ्यांना दाद दिली नाही किंवा लाच दिली नाही अशा कंत्राटदारांना सर्व प्रथम टार्गेट केले जात आहे. तर मर्जीतील रेती माफियांना कारवाईतून कसे बचावता येईल याबाबत सल्ला दिला जात आहे. रेतीसाठा मालकी जागेतून बेवारस ठिकाणी टाकण्याचे त्यांना सांगितले जाते. त्याचे पंचनामे करताना रेती कुणाची आहे, हे माहीत असतानासुद्धा बेवारस दाखविण्याचे प्रकार सुरू आहे. यामुळे उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी काठच्या गावांमध्ये हजारो ब्रास रेती बेवारस पडून आहे. आपल्या मालकी जागेतील रेती मोकळ्या जागेवर बेवारस टाकण्याच्या प्रक्रियेला आता सर्वत्र वेग आला आहे.
याशिवाय महसूल कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याने अनेकांनी आपली रेती गावातील ओळखीच्या नागरिकांच्या अंगणात साठा करून त्यांना बांधकाम चालू करणार असल्याचे ग्रामपंचायतीमार्फत प्रमाणपत्र आणून दिले आहे. या प्रकारात अनेकदा चोर सोडून संन्यासाला फाशी होण्याची शक्यता आहे. पैनगंगा नदी काठच्या गावातील काही ठळक व निवडक लोकांवरच गुन्हे दाखल झाले असून खरे रेती माफिये आजही मोकळेच आहे. दोन-चार दहा ब्रास रेती प्रकरणी कारवाई झाली. परंतु हजारो ब्रास रेतीसाठा असलेल्या माफियांकडे या कर्मचाऱ्यांची नजरच जात नाही. मोठ्या माशांना वाचविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला महसूलचे काही कर्मचारी केराची टोपली दाखवित आहे. वर्षानुवर्षे रेती माफियांशी असलेले संबंध वापरले जात असून महसूल विभागातील मंडळ अधिकारी व तलाठी यात महत्वाची भूमिका बजावत आहे. वरिष्ठांचीही दिशाभूल करीत आहे. या सर्व प्रकारात तालुक्यातील मोठे रेती माफिये अलगद सुटत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी रेती माफियांवर कारवाई करताना तालुकाबाह्य महसूल अधिकाऱ्यांना कारवाईसाठी पाठविल्यास मोठे घबाड हाती लागू शकते. अन्यथा संबंध असलेले महसूल कर्मचारी रेती माफियांना वाचविण्यासाठी धडपड करतीलच. (शहर प्रतिनिधी)
पैनगंगेच्या तीरावर रेतीचे मोठ्या प्रमाणात साठे
उमरखेड तालुक्यातून पैनगंगा नदी वाहते. आतापर्यंत हजारो ब्रास रेती पैनगंगेच्या पात्रातून उपसण्यात आली. काही ठिकाणी तर ट्रेझर बोट लावून रेतीचे उत्खनन करण्यात आले. मात्र जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या आदेशाने रेती माफियांचे धाबे दणाणले. रेतीसाठा आढळल्यास फौजदारी होत असल्याने अनेकांची पाचावर धारण बसली. पावसाळ्यासाठी केलेला रेतीसाठा आता बेवारस टाकला जात आहे. यातूनच पैनगंगा नदीच्या तीरावर शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे दिसून येत आहे. पैनगंगेच्या रेती घाटानजीक आणि इतरत्रही मोठ्या प्रमाणात रेतीचे ढिगारे दिसून येत आहे. महसूलने कारवाई केली तरी हा माल बेवारस म्हणूनच जप्त केला जातो. त्यामुळे कुणावरही कारवाई केली जात नाही.
मराठवाड्यातील रेती माफिया बेपत्ता
उमरखेड तालुक्यातील रेती घाटावर मराठवाड्यातील रेती माफियांनी मोठ्या प्रमाणात उत्खनन करीत आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यात धडक मोहीम सुरू असल्याने मराठवाड्यातील रेती माफिये बेपत्ता झाले आहे. या रेती माफियांवरही कारवाई करण्याची गरज आहे. परंतु उत्खनन करून ही मंडळी सीमापार जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले जाते.