साखर कारखान्यावर राज्य बँकेचा ताबा

By Admin | Updated: April 7, 2015 01:44 IST2015-04-07T01:44:44+5:302015-04-07T01:44:44+5:30

तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्यावर असलेल्या १०९ कोटी रुपये थकीत कर्जापोटी

Control of state bank on sugar factories | साखर कारखान्यावर राज्य बँकेचा ताबा

साखर कारखान्यावर राज्य बँकेचा ताबा

१०९ कोटी थकीत : सुधाकरराव नाईक साखर कारखाना सुरू होण्याची आशा
महागाव :
तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्यावर असलेल्या १०९ कोटी रुपये थकीत कर्जापोटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सोमवारी ताबा घेतला. २००६ पासून हा कारखाना अवसायनात असून आता राज्य बँकेने ताबा घेतल्याने कारखाना सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.
सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना विविध कारणाने २००६ मध्ये अवसायनात निघाला होता. या कारखान्यावर अवसायनात निघाला त्यावेळी ९४ कोटी रुपयांचे राज्य बँकेचे कर्ज होते. दरम्यानच्या काळात वारणा समूहाने हा साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेतला. मात्र करार मोडीत काढला. तेव्हापासून हा साखर कारखाना बंद आहे. दरम्यान, वारणा समूहाने कारखानासंबंधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र त्यांनी ही याचिका दाखल मागे घेतल्याने राज्य बँकेला कारखान्यावर ताबा घेणे सुकर झाले. राज्य बँकेच्या विभागीय व्यवस्थापक डॉ.तेजल कोरडे, उपव्यवस्थापक संगीता ठाकरे आपल्या १८ कर्मचाऱ्यांसोबत गुंज येथील कारखाना साईडवर पोहोचल्या. त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही लावला होता. अवसायक जी.एन. नाईक यांच्याकडून त्यांनी ताबा घेतला. त्यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष पंजाबराव खडकेकर, बाबुसिंग जाधव, शिवाजीराव सवनेकर, कारखान्याचे मुख्य सहाय्यक यू.एन. वानखेडे, लेखापाल अजय राठोड, कामगार संघटनेचे अध्यक्ष डी.बी. बागल उपस्थित होते. दरम्यान, मुंबई येथे ३० मार्च रोजी झालेल्या बैठकीनुसार हा कारखाना लवकरच सुरू होणार आहे. त्याचेच पाऊल म्हणून राज्य बँकेने आपला ताबा घेतला आहे.
(तालुका प्रतिनिधी)

मुख्य प्रवेशद्वारासह मालमत्तेला लावले सील
राज्य बँकेने कारखान्याचे दोन गोदाम, दोन मोठे गोदाम, मोलॅसिस टँक, प्लॅन्ट मशनरी, आॅफिस, निवासस्थाने, कारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार ताब्यात घेऊन त्याला सील लावले. तसेच या ठिकाणी राज्य बँकेने आपला फलकही लावला आहे. ९४ कोटी रुपये कर्जाचे व्याज वाढत जावून १०९ कोटी २८ लाख रुपये या कारखान्याकडे थकीत आहे. विशेष म्हणजे कारखाना अवसायनात निघाल्यानंतर व्याज लावले जात नाही. परंतु या कारखान्यावर मात्र राज्य बँकेने व्याज लावले आहे.

Web Title: Control of state bank on sugar factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.