‘त्या’ वादग्रस्त जागेचा ताबा तहसीलदारांकडे
By Admin | Updated: July 2, 2016 02:43 IST2016-07-02T02:43:07+5:302016-07-02T02:43:07+5:30
येथील राम मंदिराजवळ असलेल्या २७ हजार चौरस फूट जागेचा वाद अद्यापही मिटला नसून न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत

‘त्या’ वादग्रस्त जागेचा ताबा तहसीलदारांकडे
उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश : २७ हजार चौरस फूट जागेचा होता दोन संस्थेत वाद
पांढरकवडा : येथील राम मंदिराजवळ असलेल्या २७ हजार चौरस फूट जागेचा वाद अद्यापही मिटला नसून न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत या जागेचा ताबा (कस्टडी) तहसीलदारांकडे राहिल, असा आदेश उपविभागीय अधिकारी दीपककुमार मीना यांनी दिला.
राम मंदिराजवळ असलेल्या व खुनी नदीच्या काठावरील २७ हजार चौरस फूट जागेबाबत गेल्या अनेक वर्षांपासून भिमालपेन देवस्थान संस्था व नाठार इंग्लीश मीडिअम स्कूल, या दोन संस्थेमध्ये वाद सुरू आहे. नाठार स्कूल ही शाळा या जागेवर १९७० पासून सुरू आहे. काही दिवसापूर्वी दोन्ही संस्थेतर्फे नवीन बांधकामाच्या माध्यमातून वाद उपस्थित होऊन तणावही निर्माण झाला होता. त्यामुळे या प्रकरणात उपविभागीय दंडाधिकारी दीपककुमार मीना यांना प्राप्त अधिकारानुसार सदर जागेच्या वादाचा जोपर्यंत न्यायालयीन निकाल लागत नाही, तोपर्यंत या वादग्रस्त जागेची कस्टडी (ताबा) तहसीलदार केळापूर यांच्याकडे दिला आहे.
भिमालपेन देवस्थान संस्था व नाठार इंग्लीश मीडिअम स्कूल संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू असून हा वाद न्यायालयातसुद्धा गेला आहे. परंतु काही दिवसांपूर्वीच नाठार इंग्लीश मीडिअम स्कूलतर्फे या परिसरात मोकळ्या जागेत पुन्हा बांधकाम करणे सुरू होते. तेव्हा आदिवासी बांधवांनी याचा विरोध केला व बांधकाम तोडून टाकले. यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची वेळ आली होती. मात्र पोलीस व महसूल विभागाने यात मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. यामध्ये जागेसंदर्भात दोन्ही संस्थेतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे कागदपत्र सादर करण्यात आले. या दोन्ही संस्थेची बाजू उपविभागीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. मात्र या संस्थेचा वाद न्यायालयात प्रलंबित असून त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नसल्याने उपविभागीय अधिकारी मीना यांनी या जागेसंदर्भात पुन्हा दोन्ही समाजामध्ये वाद उपस्थित होऊ नये, यासाठी न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत भिमालपेन व नाठार इंग्लीश स्कूल संस्थेच्या जागेचा ताबा येथील तहसीलदारांकडे दिला आहे.
याशिवाय या जागेवरील मालमत्तेची देखभाल करण्याचे आदेशसुद्धा तहसीलदारांना निकालामध्ये देण्यात आले आहे. तहसीलदारांनीसुद्धा या जागेचा ताबा घेतला असून नाठार इंग्लीश मीडिअम स्कूल या संस्थेला येथे शाळा सुरू करू नये, असा आदेश जागेचा ताबा घेतल्यानंतर तहसीलदार जोरवार यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)