घटनेतील तरतुदींमुळे समाज विकासाला हातभार
By Admin | Updated: April 6, 2016 02:40 IST2016-04-06T02:40:15+5:302016-04-06T02:40:15+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या दूरदृष्टीतून देशाच्या विकासासह सर्वसामान्य समाजासाठी राज्यघटनेत केलेल्या महत्वपूर्ण तरतुदींमुळे ...

घटनेतील तरतुदींमुळे समाज विकासाला हातभार
जिल्हाधिकारी : राजपत्रित अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा, विविध विषयांवर झाले व्याख्यान
यवतमाळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या दूरदृष्टीतून देशाच्या विकासासह सर्वसामान्य समाजासाठी राज्यघटनेत केलेल्या महत्वपूर्ण तरतुदींमुळे समाजाच्या विकासाला हातभार लागला, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त येथील बचत भवनात आयोजित राजपत्रित अधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र्र काटपल्लीवार, बांधकामचे अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विजय साळवे, जिल्हा सरकारी वकील अॅड. नीती दवे आदी उपस्थित होते.
समाजात समता निर्माण व्हावी यासाठी घटनेत अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. येथे सर्वांना समान अधिकार आहे. सर्वसमावेशक घटनेच्या निर्मितीसाठी बाबासाहेबांचे फार मोठे योगदान असल्याचे पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले. समाजात जातपात, भेदभाव होऊ नये तसेच सामान्य नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्यासोबतच देशात एकता, अखंडता, समृध्दता निर्माण करण्यासाठी घटनेचे फार मोठे योगदान असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. कलशेट्टी म्हणाले, समाजात समता निर्माण करण्यासाठी सर्वांना समान पातळीवर आणणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, असे सांगितले. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांचेही यावेळी भाषण झाले. प्रेम हनवते, प्रा.माधव सरकुंडे, अॅड.नरेंद्र मेश्राम, डॉ.छाया महाले यांचे विविध विषयांवर व्याख्यान झाले. समाज कल्याणचे सहायक आयुक्त विजय साळवे यांनी प्रास्ताविक तर, संचालन घायवटे यांनी केले. (वार्ताहर)