कराराची थकबाकी २० पासून
By Admin | Updated: August 13, 2014 00:01 IST2014-08-13T00:01:40+5:302014-08-13T00:01:40+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कामगारांना २० आॅगस्टपासून कराराच्या थकबाकीचे वाटप केले जाणार आहे. मंगळवारी एसटीचे अधिकारी आणि कामगार नेत्यांमध्ये झालेल्या

कराराची थकबाकी २० पासून
एसटी कामगार : मंगळवारी झाला निर्णय, २०० कोटींचे वाटप
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कामगारांना २० आॅगस्टपासून कराराच्या थकबाकीचे वाटप केले जाणार आहे. मंगळवारी एसटीचे अधिकारी आणि कामगार नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. थकबाकीपोटी कामगारांना सहा हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळणार आहे.
एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, जनरल सेके्रटरी हनुमंतराव ताटे आदींशी झालेल्या चर्चेअंती थकबाकी वाटपाचा निर्णय झाला असल्याचे यवतमाळ विभागीय सचिव सदाशिव शिवणकर यांनी सांगितले. देय रकमेपैकी ५०० कोटी रुपये एसटीला देण्याचे शासनाने मान्य करत थकबाकीचा निर्णय महामंडळाच्या पातळीवर घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. १८ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एसटी अधिकाऱ्यांमध्ये मंत्रालयात बैठक झाली. यात विविध प्रश्नांवर चर्चा आणि निर्णय घेण्यात आले. यानंतर ६ आॅगस्टला परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याशी चर्चा झाली. यातही विविध प्रश्नांसह कराराची थकबाकी अदा करण्यासाठी ५०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार थकबाकीपोटी २०० कोटी रुपयांचे वाटप होणार आहे. (वार्ताहर)
१४ आॅगस्टला ‘इंटक’चे धरणे
‘चले जाव’ आणि निदर्शने आंदोलनाची दखल घेत एसटी कामगारांना थकबाकी वाटपाचा निर्णय घेतला. मात्र एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) आग्रही आहे. यासाठी राज्यभर एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर १४ आॅगस्टला निदर्शने केली जाणार असल्याचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले. कराराच्या थकबाकीपोटी महामंडळाला २६५ कोटी द्यावे लागणार आहे. परंतु एसटी कामगारांचे पगार शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी आहे. त्यामुळे औद्योगिक कलह कायदा १९४७ मधील तरतुदीनुसार कामगार करार रद्द करावा आणि एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढीचा नवीन करार करावा यासाठी प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष छाजेड यांनी दिला आहे.