नगरपरिषदेमध्ये बांधकाम निविदा अर्जावरून राडा
By Admin | Updated: May 5, 2016 02:36 IST2016-05-05T02:36:07+5:302016-05-05T02:36:07+5:30
नगरपरिषदेतील प्रशासकीय अनागोंदी आणि त्यावरून होणारी दमदाटी नित्याचीच झाली आहे.

नगरपरिषदेमध्ये बांधकाम निविदा अर्जावरून राडा
लिपिकाला मारहाण : ‘सीओ’ साक्षीदार
यवतमाळ : नगरपरिषदेतील प्रशासकीय अनागोंदी आणि त्यावरून होणारी दमदाटी नित्याचीच झाली आहे. बांधकाम विभागातील निविदा अर्जावरून बुधवारी सायंकाळी एका स्वीकृत नगरसेवकाने चक्क लिपिकाच्या कानशिलात हाणली. हा प्रकार बांधकाम विभाग प्रमुख व मुख्याधिकारी यांच्या समक्ष घडला. त्यानंतर हे प्रकरण सामंजस्याने निपटविण्यात आले.
बांधकाम विभागाकडून तीन लाखांपेक्षा कमी दराच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. २४ एप्रिल ते ४ मेपर्यंत या निविदा अर्जासाठी अर्ज करून चलान भरावयाची होती. शर्मा नामक कंत्राटदार सकाळपासून अर्ज व चलान घेऊन पालिकेत चकरा मारत होता. मात्र त्याला उडवाउडवीची उत्तरे देऊन सायंकाळपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले. हा प्रकार एका स्वीकृत नगरसेवकाला सांगण्यात आला. त्यानंतर या स्वीकृत नगरसेवकाने कार्यकर्त्यासह नगरपरिषदेत धडक दिली. वाहन तळातच नगर अभियंता, मुख्याधिकारी उपस्थित होते. त्यांच्या समक्ष संबंधित लिपिकाला बोलावून त्याच्या कानशिलात हाणण्यात आली. निविदा मॅनेज करीत असल्याचा आरोप या नगरसेवकाने केला. या गंभीर प्रकाराची कोठेच तक्रार झाली नाही. असे प्रकार नगरपरिषदेत नित्याचेच झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)