बांधकामाचा सज्जा कोसळला; घरमालकाचा मृत्यू, मोझर येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2024 19:02 IST2024-02-03T19:01:46+5:302024-02-03T19:02:02+5:30
तिघे जण झाले जखमी

बांधकामाचा सज्जा कोसळला; घरमालकाचा मृत्यू, मोझर येथील घटना
नेर ( यवतमाळ ) : तालुक्यातील मोझर येथे घराच्या बांधकामावर छपाई चालू असताना सज्जा कोसळला. या घटनेत घरमालकाचा मृत्यू झाला असून, ३ मजूर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
मोझर येथे सुदाम नासरे (वय ५२) हे परिवारासह राहतात. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी दुपारी ३ मजूर काम आटोपून जेवायला सज्जावरून खाली येत असताना दिव्यांग असलेले घरमालक सुदाम नासरे हे घराच्या ओट्यावर बसून होते. तेवढ्यात बांधकामाचा सज्जा अचानक कोसळला. यावेळी खाली बसून असलेले सुदाम नासरे यांच्या अंगावर सज्जा कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. तर मजूर पंकज कैलास खरापे (वय २०), प्रमोद मुकुंद चंदने (वय ३९), नितीन निळकंठ दाभीरे (वय ३९) रा. धनज माणिकवाडा हे जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने नेरच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील गंभीर जखमी असलेले घरमालक सुदाम नासरे यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. तर पंकज खरापे यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. दोन जखमींवर नेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.