२१ उपकेंद्रांचे बांधकाम रखडले
By Admin | Updated: December 22, 2016 00:01 IST2016-12-22T00:01:42+5:302016-12-22T00:01:42+5:30
निधीअभावी जिल्ह्यातील २१ आरोग्य उपकेंद्रांचे बांधकाम रखडले आहे. याशिवाय २६ डॉक्टरांची कमतरता आहे.

२१ उपकेंद्रांचे बांधकाम रखडले
यवतमाळ : निधीअभावी जिल्ह्यातील २१ आरोग्य उपकेंद्रांचे बांधकाम रखडले आहे. याशिवाय २६ डॉक्टरांची कमतरता आहे. यामुळे जिल्ह्यात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडत आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत बुधवारी आरोग्य सेवेचा आढावा घेण्यात आला. त्यात जिल्ह्यातील २१ उपकेंद्रांचे बांधकाम रखडल्याचे समोर आले. यासाठी शासनाकडे २० कोटी रूपयांची मागणी करण्यात आली. मात्र अद्याप शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला नाही. यापूर्वी काही उपकेंद्रांच्या बांधकामासाठी १० कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी केवळ दोन कोटी रूपयांचाच निधी देण्यात आला होता. त्यामुळे आता शासनाकडून निधी प्राप्त होतपर्यंत या बांधकामांना प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यताच प्रदान करायची नाही, असा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये तब्बल २६ डॉक्टरांचा तुटवडा आहे. ही पदे भरण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर आता कुठे पदे भरण्यासाठी मुलाखती घेण्याचा निर्णय झाला. यापूर्वी मुलाखती पार पडल्यानंतर आदेश देऊनही केवळ दोनच डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रात रूजू झाले होते. त्यामुळे यावेळीही मुलाखतीनंतर किती डॉक्टर प्रत्यक्षात रूजू होतील, हा प्रश्न कायम आहे. आरोग्य समितीच्या सभेत सभापती नरेंद्र ठाकरे व सदस्यांनी मुलींच्या लिंग प्रमाणात वाढ करण्याबाबतही खल केला. सध्या जिल्ह्यात एक हजार पुरूषांमागे केवळ ९४६ महिला आहेत. यात वाढ करण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करण्याचे निर्देश सभापती नरेंद्र ठाकरे यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)
दहेगावचे केंद्र हलविण्यात अडथळा
राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे प्राथमिक आरोग्य आहे. त्यामुळे तेथील आरोग्य उपकेंद्र आष्टोणा येथे हलविण्याचे निर्देश सभापती नरेंद्र ठाकरे यांनी दिले. मात्र जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी शासकीय निकषानुसार ते उपकेंद्र हलविता येणार नसल्याचे सांगितले. यावर सभापतींनी त्रागा करीत यापूर्वी काहीच निकष नव्हते का, अशी विचारणा करून आपला संताप व्यक्त केला.