पोलिसांच्या बदल्यांबाबत एसपींना सहानुभूती सोयीच्या ठिकाणासाठी विचार
By Admin | Updated: May 11, 2014 00:37 IST2014-05-11T00:37:29+5:302014-05-11T00:37:29+5:30
जिल्हा पोलीस दलात बदल्यांबाबत कर्मचार्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. दूरच्या ठिकाणी बदली झाली तर काय, असा प्रश्न भेडसावत आहे.

पोलिसांच्या बदल्यांबाबत एसपींना सहानुभूती सोयीच्या ठिकाणासाठी विचार
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलात बदल्यांबाबत कर्मचार्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. दूरच्या ठिकाणी बदली झाली तर काय, असा प्रश्न भेडसावत आहे. अशा स्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक मात्र बदल्यांबाबत कर्मचार्यांशी सहानुभूती ठेवून आहे. पोलिसांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन आणि नियमात बसवून त्यांचे स्थानांतरण करण्यात येईल. कुणावरही अन्याय होणार नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एकाच ठाण्यात अथवा शाखेत दोन वर्षे आणि एकाच उपविभागात चार वर्षे सलग कार्यरत असणार्या पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या करा, असे आदेश गृह विभागाने काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पोलीस दलात बदली प्रक्रियेला वेग आला आहे. यवतमाळ जिल्हा हा ३५० किलोमीटर क्षेत्रात व्यापला आहे. त्यामुळे जिल्हा केंद्रापासून काही पोलीस उपविभागाचे अंतर हे दीडशे किलोमीटरवर आहे. त्यामुळे एका टोकावरून दुसर्या टोकावर बदली झाल्यास काय करावे, अशी धास्ती अनेक पोलीस कर्मचार्यांनी घेतली होती. शिवाय स्थायिक झालेल्या कुटुंबाला आता आपल्याबरोबर नियुक्तीच्या ठिकाणी हलवावे लागेल. त्यामुळे शिक्षण घेत असलेल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होईल. अनेक पोलीस कर्मचार्यांची मुले ही दहावी आणि बारावीत शिकतात. त्यामुळे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने अनेक जण चिंतातूर झाले होते. परंतु पोलीस हे शिस्तीचे खाते असल्याने येथे दादही मागता येत नाही. ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी स्थिती या नव्या अध्यादेशाने पोलिसांची झाली होती. हा अध्यादेश आल्यापासून अनेक पोलीस कर्मचार्यांचे कर्तव्यातही चित्त नव्हते. ११ मे पासून बदली प्रक्रिया सुरू होत असल्याने अनेकांनी त्याचा धसका घेतला होता. ही बाब ‘लोकमत’ने शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे मांडली. तेव्हा त्यांनी जिल्हा पोलीस दलात सुमारे दोन हजार ५०० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. शासनाच्या दोन वर्षे एकाच ठिकाणी आणि एका उपविभागात चार वर्षे या नव्या अध्यादेशात त्यातील सुमारे एक हजार ५०० पोलीस कर्मचारी बदलीसाठी पात्र ठरतात. शासनाने घेतलेला हा निर्णय सोयीचा नाही, असे कर्मचार्यांच्या वाटते. मात्र त्यांची गैरसोय होणार नाही, याची पूर्णपणे या बदली प्रक्रियेत दक्षता घेतली जाईल. उपविभागाला लागूनच असलेल्या जवळच्या दुसर्या उपविभागात अथवा सोयीचे होईल, अशा ठिकाणी त्यांना नियुक्ती दिली जाईल. एकूण कर्मचार्यांपैकी ३० टक्के बदलीपात्र कर्मचार्यांच्या बदल्या करण्याचे बंधन आहे. त्यामध्ये सुमारे ८०० पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. तेव्हा सहा ते सात वर्षांपासून एकाच उपविभागात, एकाच ठाण्यात अथवा शाखेत येथून चाळणी लावण्यात येईल. त्यामध्ये एका उपविभागात आणि एका ठिकाणी चार वर्षे कार्यरत असलेल्या कर्मचार्यांचा बदल्यांमध्ये समावेश राहील, अशी शक्यता आहे. त्यातही कौटुंबिक अडचणी आणि सोयीच्या ठिकाणांचा विचार करूनच नियमात बसवून बदल्या करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली. त्यामुळे एसपी शर्मा यांची अडचणीत सापडलेल्या कर्मचार्यांबाबत सहानुभूती असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या या भूमिकेने एकप्रकारे पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांपर्यंत सर्वच कर्मचार्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी) ३०२ पोलीस कर्मचार्यांना पदोन्नती जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक शर्मा यांनी जिल्हा पोलीस दलात कार्यरत आणि सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र पोलीस कर्मचार्यांना पदोन्नती दिली. त्यामध्ये येथील पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकापर्यंतच्या ३०२ कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात आली. जिल्हा पोलीस दलात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पदोन्नत्या दिल्या गेल्या आहेत.