शासनाच्या जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेसचा रास्तारोको
By Admin | Updated: February 7, 2015 23:32 IST2015-02-07T23:32:30+5:302015-02-07T23:32:30+5:30
भाजप-शिवसेनेच्या केंद्र आणि राज्य सरकारने जनविरोधी धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे या धोरणाच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यातच काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

शासनाच्या जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेसचा रास्तारोको
यवतमाळ : भाजप-शिवसेनेच्या केंद्र आणि राज्य सरकारने जनविरोधी धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे या धोरणाच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यातच काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळात ९ फेब्रुवारीला जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने रास्तारोको करण्यात येणार असल्याची माहिती माजी सामाजिक न्यायमंत्री अॅड़ शिवाजीराव मोघे यांनी दिली. ते शनिवारी येथील विश्रामभवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
माजी मंत्री अॅड़ मोघे पुढे म्हणाले, नैसर्गिक संकटाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे शासनाने त्यांना भरीव मदत द्यायला हवी होती. परंतु आर्थिक मदत दिल्याचा गवगवा करीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करण्यात आले. निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले मात्र ते अद्याप पाळल्या गेले नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ४६ डॉलर प्रती बॅरल एवढे कमी झाले. त्यामुळे पेट्रोल प्रती लिटर ३५ रुपये तर डिझेल २३ रुपये दराने विक्री व्हायला हवे होते. असे असताना त्यापेक्षा दुप्पट भावात डिझेल व पेट्रोलची विक्री सुरू आहे.
अन्न सुरक्षा योजनेला कात्री लावून राज्यातील एक कोटी ७७ लाख गरजू कुटुंबाना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार केल्याचा आरोपही मोघे यांनी केला. तसेच यासर्व बाबींच्या निषेधार्थ हा रास्तारोको केल्या जाणार आहे. ९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता येथील बसस्थानक चौकात हे आंदोलन होईल, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)