काँग्रेसची लक्तरे वेशीवर

By Admin | Updated: December 11, 2014 23:15 IST2014-12-11T23:15:32+5:302014-12-11T23:15:32+5:30

तब्बल ४६ वर्षानंतर म्हणजे शिंगणकरानंतर उमरखेडसाठी मागासवर्गाला उमेदवारी मिळाली. मागासवर्गाला उमेदवारी मिळताच ज्यांनी निरंकुश सत्ता भोगली त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

The Congress's gates are on the gates | काँग्रेसची लक्तरे वेशीवर

काँग्रेसची लक्तरे वेशीवर

राजाभाऊ बेदरकर - उमरखेड
तब्बल ४६ वर्षानंतर म्हणजे शिंगणकरानंतर उमरखेडसाठी मागासवर्गाला उमेदवारी मिळाली. मागासवर्गाला उमेदवारी मिळताच ज्यांनी निरंकुश सत्ता भोगली त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यातून दोन माजी आमदारांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे उमरखेड काँग्रेसची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
मागास आरक्षणातून निवडून आलेले माजी आमदार विजय खडसे यांना पहिलीच निवडणूक सत्त्व परीक्षा ठरली. काँग्रेसमधीलच काही दिग्गजांनी खडसेंची उमेदवारी जाहीर होताच नाक मुरडणे सुरू केले. परंतु त्यावेळी लोकांना बदल हवा होता. त्यामुळे खडसे विजयी झाले. हा विजय खडसे नको म्हणणाऱ्यांनी नाईलाजास्तव साजरा केला. नंतरच्या पाच वर्षात सगळे जण खडसेंच्या सत्तेच्या गाडीत बसले. वास्तविक खडसेंनीच या सगळ्यांना सोबत घेऊन काँग्रेसची आब राखत काँग्रेसच्या मतदारसंघातील विकासाचा गाडा पुढे रेटत नेला. पाच वर्षांपर्यंत सोबत राहणाऱ्यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली असता काँग्रेसचे निष्ठावान म्हणविणाऱ्यांनी मला विधानसभेच्या निवडणुकीत एकाकी का पाडावे, हाच खडसेंचा खरा राग होता. माजी आमदार अ‍ॅड.देवसरकर आणि खडसेंमध्ये पराभवाच्या निमित्ताने चांगलेच वादंग निर्माण झाले. कोण कसे बोलले, कुठे बोलले, काय बोलले हा वेगळा चर्चेचा व रोषाचा विषय असला तरी या निमित्ताने उमरखेड काँग्रेसची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली, एवढे मात्र खरे. खडसेंनीही अनेक दिवस केवळ मनात ठेवलेला रोष एकदाचा बोलून दाखविला. आता मात्र दोघेही माजी आमदार झाले आहेत. परंतु जनतेत मात्र काँग्रेसच्या दृष्टीने आवश्यक तो संदेश गेला नाही. संपूर्ण राज्यात काँग्रेसची गळती असताना लोकसभेतील काँग्रेसच्या विजयामुळे लोकांना थोडीफार आशा होती. तीसुद्धा अंतर्गत राजकारणामुळे धूसर झाली. व्यक्तिगत बाबींमुळे पक्षाची किती हानी होते हे या प्रकरणावरून सगळ्यांनाच जाणवले. पक्षापेक्षा कोणतीच व्यक्ती मोठी नसते याचा विचार दोन्ही आमदारांना पडलेला दिसतो. पक्षाच्या बळावरच अ‍ॅड.देवसरकर दोनदा या भागाचे आमदार झाले आणि खडसेही मोठे झाले. तालुका काँग्रेसमधील हे भांडण ज्यांचा काँग्रेसच्या कार्यशैलीवर विश्वास आहे त्यांचा हिरमोड करण्यास कारणीभूत ठरले. उमरखेड विधानसभा क्षेत्र मागासवर्गीय उमेदवाराला शाप ठरतो की काय, असे वाटायला लागले. ज्यांची खडसेंवर विशेषत: निष्ठा होती ते मागासवर्गीयसुद्धा आता बोलू लागले आहेत. त्यांच्या मनात कुठे तरी कळ उठत असून आंबेडकरी विचारसरणीला छेद देणारा गट तर मतदारसंघात सक्रिय होत नाही ना, या शंकेने त्यांना ग्रासले आहे. दोघा माजी आमदारांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, अशी सर्वसामान्यांची त्यांच्याकडून माफक अपेक्षा असल्याचे दिसून येते.

Web Title: The Congress's gates are on the gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.