मारेगावात काँग्रेसचे धनराज कुमरे विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:12 IST2017-12-14T23:12:29+5:302017-12-14T23:12:48+5:30
मारेगाव पंचायत समितीअंतर्गत मार्डी गणाच्या एका जागेसाठी बुधवारी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे धनराज हरिभाऊ कुमरे हे ९२३ मतांनी विजयी झाले. त्यांना तीन हजार ८८० मते मिळाली.

मारेगावात काँग्रेसचे धनराज कुमरे विजयी
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : मारेगाव पंचायत समितीअंतर्गत मार्डी गणाच्या एका जागेसाठी बुधवारी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे धनराज हरिभाऊ कुमरे हे ९२३ मतांनी विजयी झाले. त्यांना तीन हजार ८८० मते मिळाली.
त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे गजानन मारोती मेश्राम यांना दोन हजार ९५७, तर भाजपाचे नागो मारोती कुळमेथे यांना एक हजार २७० मते मिळाली. या निवडणुकीत १४३ मतदारांनी नोटाचा वापर केला. या गणातील एकूण १२ हजार ५३१ मतदारांपैकी आठ हजार २५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी महसूल प्रशासन, निवडणूक विभाग व स्थानिक पोलिसांनी परिश्रम घेतले.
काँग्रेसने जागा राखली
मारेगाव पंचायत समितीमधील मार्डी गणाचे काँग्रेसचे सदस्य श्रीकृष्ण कुमरे यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. काँग्रेसने श्रीकृष्ण यांचे भाऊ धनराज यांना उमेदवारी देऊन निवडून आणत ही जागा कायम राखली.
शिवसेनेचा पराभव
मार्डी गणाची ही निवडणूक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. मात्र सुमारे ९२३ मतांनी पराभव झाल्याने शिवसेनेचे अपयश उघड झाले.