सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने
By Admin | Updated: December 20, 2015 02:27 IST2015-12-20T02:27:10+5:302015-12-20T02:27:10+5:30
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून संतप्त झालेल्या येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक पवित्रा घेतला.

सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने
नॅशनल हेरॉल्डप्रकरण : बसस्थानक चौकात रास्ता रोको, टायर जाळले
यवतमाळ : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून संतप्त झालेल्या येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक पवित्रा घेतला. शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी बसस्थानक चौकात टायर पेटवून रास्ता रोको केला. यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यात तू-तू-मै-मै झाली. या आंदोलनामुळे सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी काँग्रेसच्या ५० कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. यामुळे संतप्त झालेले काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आर्णी मार्गावरील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून एका मोर्चाने काँग्रेस नेते व कार्यकर्ते येथील बसस्थानक चौकात आले. मोर्चात केंद्र सरकारविरोधी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांच्या हातात सरकाविरोधी फलके होती. हा मोर्चा येथील बसस्थानक चौकात दुपारी २.३० वाजताच्या सुमारास धडकला. बसस्थानक चौकात निदर्शने करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या दिला. तसेच चौकात टायर जाळून मोदी सरकारचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलीस आणि कार्यकर्त्यात धक्काबूक झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पोलीस प्रयत्न करीत होते. दरम्यान पेटते टायर विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करून एका वाहनातून शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या आंदोलनात माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी विधानसभा उपाध्यक्ष वसंतराव पुरके, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार कीर्ती गांधी, विजयाताई धोटे, विजय खडसे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष प्रतिभा खडसे, जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे, अॅड.सचिन नाईक, देवानंद पवार, डॉ.मो.नदिम, आरिज बेग, अशोक बोबडे, अरुण राऊत, जितेंद्र मोघे, भारत राठोड, अनिल गायकवाड, रोहीत देशमुख, शब्बीर खान, आनंद शर्मा, तातू देशमुख, अरविंद वाढोणकर, सिकंदर शहा, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष विजया सांगळे, पल्लवी रामटेके, मीनाक्षी वेट्टी, वंदना गुप्ता, शीला कोटंबे, उषा दिवटे, कैलास सुलभेवार, डॉ.रमेश महानूर, अनंता जोशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)
आंदोलनकर्ते संतप्त
बसस्थानक चौकात आंदोलन सुरू असताना पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यात धक्काबुक्की झाली. यावेळी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव पुरके यांना एका पोलिसाने धक्काबुक्की केली. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले. संबंधित पोलिसाला निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी आमचा धक्काबुक्की करण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असे सांगितले.