गृहजिल्ह्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कसोटी
By Admin | Updated: October 9, 2014 23:10 IST2014-10-09T23:10:32+5:302014-10-09T23:10:32+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांची आपल्या यवतमाळ या गृहजिल्ह्यातच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षाच्या सातही जागा निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे.

गृहजिल्ह्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कसोटी
यवतमाळ : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांची आपल्या यवतमाळ या गृहजिल्ह्यातच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षाच्या सातही जागा निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे. त्यातच मुलगा राहूलच्या उमेदवारीने जणू माणिकरावांच्या राजकीय अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.
माणिकरावांनी सातही मतदारसंघात पक्षाचे स्टार प्रचारक व अन्य वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा, रोड शो, प्रचार रॅली याचे नियोजन करणे अपेक्षित आहे. स्वत: माणिकरावांनी सातही मतदारसंघात भेटी देऊन काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात माणिकराव ठाकरे यांनी जिल्ह्यातील उमरखेडपासून वणीपर्यंतचे सहा विधानसभा मतदारसंघ जणू वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. माणिकराव आपली संपूर्ण शक्ती केवळ यवतमाळातच वापरत आहे. कारण त्यांचा मुलगा राहुल ठाकरे येथून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवित आहे. माणिकरावांनी येथील विद्यमान आमदार नंदिनी नीलेश पारवेकर यांचे तिकीट अखेरच्या क्षणी कापले. नंदिनींच्या तिकीटासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, शिवराज पाटील चाकुरकर, जितेंद्र सिंग यांनी दिल्लीत पक्ष श्रेष्ठींकडे अखेरपर्यंत प्रयत्न केले. नंदिनी नीलेश पारवेकरांचे तिकीट कापण्यास खासदार विजय दर्डा यांनी तीव्र विरोध केला होता. केवळ नंदिनी पारवेकरांचेच तिकीट कापत असाल तर योग्य नाही, अशी भूमिका दर्डा यांनी घेतली. सर्वत्रच उमेदवारात बदल होत असतील आणि नंदिनी पारवेकरांमध्ये इलेक्टीव्ह मेरिट नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांचा पर्याय उपलब्ध आहे, असे विजय दर्डा यांनी पक्ष श्रेष्ठींना सूचविले होते, हे विशेष! मात्र अखेरच्या क्षणी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची धमकी देऊन मुलगा राहुलसाठी माणिकरावांनी यवतमाळचे तिकीट खेचून आणले. आता तिकीट आणले मात्र विजयाचे काय, असा प्रश्न आहे. जिल्ह्यात काँग्रेसने रिपीट केलेले सर्वच उमेदवार निवडून येतील काय?, स्वत: माणिकराव मुलगा राहुलच्या विजयाची शंभर टक्के खात्री देऊ शकतात काय ?, असे प्रश्न कार्यकर्त्यांमधून उपस्थित केले जात आहेत. मुलाच्या विजयासाठी माणिकराव महाराष्ट्र आणि यवतमाळ जिल्हा हे आपले कार्यक्षेत्र बाजूला ठेऊन केवळ यवतमाळ मतदारसंघात फिरत आहेत. वॉर्डावॉर्डातील लहान-मोठ्या नेत्यांच्या घरी भेटी देताना माणिकराव दिसत आहे. यावरून त्यांना मुलाच्या विजयाची पक्की खात्री नसल्याचे व मतदार काँग्रेसवर नाराज असल्याचे जाणवते. माणिकरावांनी पुत्रप्रेमापोटी अन्य पक्षातीलही पदाधिकाऱ्यांना आपल्या राजकीय ‘शक्ती’च्या बळावर फितूर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. माणिकराव केवळ यवतमाळ मतदारसंघात लक्ष देत असल्याने काँग्रेसच्या अन्य उमेदवारांमधून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. माणिकरावांनी आपल्या दिग्रस-दारव्हा या गृह मतदारसंघाकडेही पाठ फिरविली आहे. सहा महिन्यांपूर्वी विद्यमान मंत्री-आमदार आणि त्यांच्या पुत्रांना विधानसभेची तिकीट काँग्रेसने देऊ नये म्हणून जाहीर भूमिका घेणाऱ्या दुसऱ्या फळीतील प्रमुख बंडखोरांपैकीच एकाला माणिकरावांनी आपल्या गृहमतदारसंघाचे काँग्रेसचे तिकीट दिले. मोघे विरोधक हा या तिकिटासाठीचा मुख्य निकष होता, हे विशेष.