काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कसोटी

By Admin | Updated: August 8, 2014 00:12 IST2014-08-08T00:12:09+5:302014-08-08T00:12:09+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा वाद दिल्लीत जाऊ न देता यवतमाळ जिल्ह्यातच सोडविताना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची चांगलीच कसोटी लागणार आहे.

Congress State President's Test | काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कसोटी

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कसोटी

विधानसभेचे जागा वाटप : यवतमाळचा तिढा दिल्लीत जाऊ न देण्याचे आव्हान
यवतमाळ : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा वाद दिल्लीत जाऊ न देता यवतमाळ जिल्ह्यातच सोडविताना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची चांगलीच कसोटी लागणार आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढणार हे स्पष्ट झाले आहे. आता जागा वाटपावरून ताण-तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात तिढा न सुटलेल्या जागांचा वाद थेट दिल्लीत नेला जाणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात हा वाद असला तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा यवतमाळ हा गृहजिल्हाही यातून सुटणार नाही, अशी चिन्हे दिसू लागली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या वाढीव जागांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा आहेत. त्यापैकी पुसदची एकमेव जागा राष्ट्रवादीकडे आहे. तर अन्य सहा जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडणूक लढली आहे. यावेळीसुद्धा काँग्रेसचा एकही जागा न सोडण्याचा हट्ट आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने यवतमाळ, दिग्रस व उमरखेड या तीन वाढीव जागांची मागणी काँग्रेसकडे केली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यासंबंधी थेट शरद पवार यांना निवेदन दिले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र्यांनीसुद्धा नुकतेच वाढीव जागा घेणारच असे सुतोवाच केले होते. राष्ट्रवादीला कोणत्याही परिस्थितीत यवतमाळची जागा हवी आहे. सोबतच किमान उमरखेड मतदारसंघ वाटाघाटीत पदरी पडावा म्हणून अखेरपर्यंत प्रयत्न केले जाणार आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी नुकतीच जिल्ह्याचे संपर्क नेते मनोहरराव नाईक यांची भेट घेऊन यासंबंधी मागणी रेटली होती.
तीन वाढीव मतदारसंघावर दावा सांगून किमान यवतमाळ मतदारसंघ पदरी पाडून घ्यावा, अशी राष्ट्रवादीची खेळी असण्याची शक्यता आहे. यवतमाळचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. त्याच वेळी काँग्रेसनेही या जागेवरील दावा सोडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
नंदिनी पारवेकर येथे विद्यमान आमदार असल्या तरी त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही याबाबत काँग्रेसच्या गोटातच साशंकता आहे. प्रदेशाध्यक्षांनी यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून मुलासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या गटातूनच पारवेकरांच्या विरोधात अधिक वावड्या उठविल्या जात असल्याची चर्चा आहे.
प्रदेशाध्यक्षांना मुलासाठी तर राष्ट्रवादीला आपल्याच नेत्यासाठी यवतमाळ मतदारसंघ हवा आहे. त्यामुळे या जागेसाठी अखेरपर्यंत रस्सीखेच होणार हे स्पष्ट आहे. राज्यात तोडगा न निघाल्यास यवतमाळच्या जागेचा वाद दिल्लीपर्यंत नेण्याची राष्ट्रवादीची व्युहरचना आहे. जागा खेचून आणणे आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे जिल्ह्यासह राज्यात पक्षातच वजन नसल्याचे दाखवून देणे अशी दुहेरी खेळी यामागे राष्ट्रवादीची असण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत यवतमाळ या आपल्या गृहजिल्ह्यातील जागा वाटपाचा वाद दिल्लीपर्यंत जाऊ नये असा प्रयत्न माणिकरावांकडून होणार आहे. त्यात राष्ट्रवादीची मनधरणी करण्यात माणिकराव यशस्वी होतात की मुलासाठीच्या प्रयत्नांवर त्यांना पाणी सोडावे लागते याकडे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Congress State President's Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.