काँग्रेस-शिवसेनेत तुल्यबळ लढत

By Admin | Updated: November 16, 2016 00:21 IST2016-11-16T00:21:42+5:302016-11-16T00:21:42+5:30

विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होणार आहे.

Congress-Shiv Sena combine | काँग्रेस-शिवसेनेत तुल्यबळ लढत

काँग्रेस-शिवसेनेत तुल्यबळ लढत

विधान परिषद : सर्वच पक्षांना मते फुटण्याची भीती, स्थानिक उमेदवाराबाबत सहानुभूती
यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होणार आहे. भरघोस पाठिंब्याचा दावा होत असला तरी सर्वच पक्षांना आपली मते फुटण्याची भीती आहे.
काँग्रेसचे शंकर बडे आणि शिवसेनेचे प्रा. तानाजी सावंत यांच्यात विधान परिषदेसाठी थेट लढत होणार आहे. सेना उमेदवारामुळे युतीचे मंत्री व आमदारांची तर काँग्रेस उमेदवारामुळे माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोनही उमेदवारांच्या जशा काही जमेच्या बाजू आहेत तसेच काही नुकसानकारक पैलूही आहेत. काँग्रेसचे उमेदवार शंकर बडे यांच्याबाबत संपूर्ण जिल्ह्यातीलच मतदारांमध्ये सहानुभूती पहायला मिळत आहे. कारण ते स्वत: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांपैकी एक आहेत. स्थानिक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. काँग्रेसचे मूळ संख्याबळ १५५ च्या आसपास आहे. याशिवाय सर्वच पक्षातील अनेकांनी त्यांना ‘आपल्या जिल्ह्यातील’ म्हणून ‘शब्द’ दिला आहे. त्यासाठी अनेकांनी आर्थिक झळ सोसण्याची तयारीही दर्शविली आहे. काँग्रेसमधील आतापर्यंत काठावर वाटणारे दोन नेतेही आता प्रामाणिकपणे सोबत असल्याने बडे ‘प्लस’ झाल्याचे मानले जाते.
‘अशक्त’ बडेंना हवी ‘संजीवनी’
विरोधी उमेदवाराच्या तुलनेत शंकर बडे आर्थिकदृष्ट्या अगदीच ‘अशक्त’ आहेत. हा त्यांचा सर्वात मोठा ‘मायनस’ पॉर्इंट असला तरी जिल्ह्यातील वर्षानुवर्षे मंत्रीपद उपभोगलेले सर्व प्रमुख काँग्रेस नेते आपल्या खिशातून त्यांना ‘संजीवनी’ देऊ शकतात. त्यासाठी केवळ इच्छाशक्तीची तेवढी गरज आहे. बडेंच्या या अशक्ततेवर जिल्ह्यातील मतदारांची सहानूभूती मात करेल, असा विश्वास व्यक्त करून काँग्रेस नेते स्वत:ची सुटका करू पाहत आहे. मात्र या नेत्यांनी तात्पुरते का होईना बडेंना ‘बळ’ देणे अपेक्षित असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. विधान परिषदेच्या या लढतीकडे ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ अशा नजरेने पाहिले जात आहे. काँग्रेसच्या येथील तमाम दिग्गज नेत्यांनी एकजुटीने तन-मन-धनाने प्रयत्न केल्यास बडेंचा विजय कठीण नाही, असे राजकीय गोटात मानले जाते.
तानाजींचे साम्राज्य ठरले आकर्षण
शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत आर्थिक दृष्ट्या ‘भक्कम’ आहेत. ही त्यांची सर्वात जमेची बाजू आहे. याशिवाय मराठवाड्यात त्यांनी भरउन्हाळ्यात केलेल्या जलसंधारणाच्या प्रचंड कार्याची आणि त्यांच्या उस्मानाबाद, सोलापूर, पुण्यातील डोळे विस्फारणाऱ्या साम्राज्याची संपूर्ण जिल्ह्यातच जोरदार चर्चा होत आहे. त्यांच्या शैक्षणिक संस्था, साखर कारखानदारी, दुग्ध संस्था, तेथे हजारोंच्या संख्येने असलेला कर्मचारी वर्ग, त्यांची वार्षिक उलाढाल, बॅलन्सशीट, रेकॉर्डवरील संपत्तीचे विवरण आदी मुद्यांवर शिवसेना-भाजपाच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि जनतेतही चर्चा ऐकायला मिळत आहे. एवढे साम्राज्य असूनही तानाजी सावंत यांच्यातील मीतभाषीपणा, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे कौशल्य कुणालाही प्रभावित करणारे आहे. प्रा. तानाजी सावंत यांच्या विजयात शिवसेनेचे येथील राज्यमंत्री, खासदार, भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री, स्थानिक राज्यमंत्री, भाजपाचे अन्य चार आमदार या सर्वांचेच यश अवलंबून आहे. त्यामुळे या सर्वांना आपल्या मतदारसंघातील मते फुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे. सावंत पराभूत झाल्यास त्याचा परिणाम युतीच्या राजकारणावर आणि या सर्वच नेत्यांच्या ‘परफॉर्मन्स’वर होऊ शकतो. त्याची ‘सीएमओ’ आणि ‘मातोश्री’ने दखल घेतल्यास भविष्यात अनेकांची अडचण होईल, एवढे निश्चित!
अपक्षाच्या पाठिंब्याने ‘मायनस’ची हूरहूर
राष्ट्रवादी समर्थित अपक्षाने घेतलेली माघार नेमकी कुणाच्या पथ्यावर पडते, याबाबत राजकीय तज्ज्ञांकडून वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहे. हा अपक्ष ज्यांच्यासोबत त्यांच्याविरोधात आम्ही, अशा अनेक मतदारांच्या प्रतिक्रिया असल्याने या अपक्षाची साथ शिवसेनेला ‘मायनस’ तर करणार नाही ना ? अशी हूरहूर कार्यकर्त्यांमध्ये पहायला मिळते आहे. वास्तविक या अपक्षाने निवडणूक लढविल्यास शिवसेनेच्या उमेदवाराला फायदा होईल, असा युतीच्या दोनही मंत्र्यांचा अंदाज होता. मात्र प्रा. सावंत यांनी ‘रिस्क’ नको असे म्हणत त्या अपक्षावर आपले ‘वजन’ वापरुन त्याला बसविले. भाजपा-सेना-राष्ट्रवादीतील मते फुटून सहानूभूतीमुळे आमच्याकडे येतील, असा दावा काँग्रेसमधून केला जात आहे. त्याचवेळी काँग्रेसच्याही अनेक मतदारांवर शिवसेनेने यशस्वीरीत्या आपले जाळे फेकल्याचे सांगितले जात आहे.
नेत्यांनी अपक्ष लढविण्याचा आणि माघार घेण्याचा निर्णय परस्परच घेतल्याने मुळात राष्ट्रवादीचे मतदार नाराज आहेत. त्या बळावरच ही नाराज मंडळी शंकर बडे यांच्यासोबत असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांकडून जाहीररीत्या केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Congress-Shiv Sena combine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.