विधान परिषदेसाठी काँग्रेस, सेनेचे नामांकन

By Admin | Updated: November 3, 2016 03:15 IST2016-11-03T03:15:21+5:302016-11-03T03:15:21+5:30

विधान परिषद निवडणुकीसाठी बुधवारी अखेरच्या दिवशी काँग्रेसचे शंकर बडे, शिवसेना-भाजपा युतीचे

Congress, Senna nomination for Legislative Council | विधान परिषदेसाठी काँग्रेस, सेनेचे नामांकन

विधान परिषदेसाठी काँग्रेस, सेनेचे नामांकन

शंकर बडे, तानाजी सावंत : तीन अपक्षही रिंगणात, राष्ट्रवादी काँग्रेसवर अपक्षाला पाठिंबा देण्याची वेळ
यवतमाळ : विधान परिषद निवडणुकीसाठी बुधवारी अखेरच्या दिवशी काँग्रेसचे शंकर बडे, शिवसेना-भाजपा युतीचे तानाजी सावंत यांच्यासह अन्य तीन अपक्ष उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले. यावेळी उमेदवारांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली होती.
१९ नोव्हेंबर रोजी विधान परिषदेच्या यवतमाळ या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक होऊ घातली आहे. यवतमाळची ही जागा सध्या राष्ट्रवादीकडे आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला पुन्हा संधी द्यायची नाही, या दृष्टीने काँग्रेस आणि शिवसेना-भाजपाने जोरकस प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी आवश्यक ती सर्व ‘शक्ती’ खर्ची घालण्याची तयारी दोन्ही प्रमुख उमेदवारांनी केली आहे.
बुधवार हा विधान परिषदेच्या नामांकनाचा अखेरचा दिवस होता. काँग्रेसतर्फे पांढरकवडा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष शंकर बडे यांनी आपले नामांकन दाखल केले. यावेळी त्यांच्या भगिनींनी खास केळापूरवरून आरती आणून त्यांचे औक्षवण केले. शंकर बडे यांचे नामांकन दाखल करताना हिंगोलीचे खासदार राजीव सातव, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, कळमनुरीचे आमदार संतोष टारपे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रा.वसंतराव पुरके, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, संजय देशमुख, पक्षाचे जिल्हा प्रभारी श्याम उमाळकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार, माजी आमदार कीर्ती गांधी, नंदिनी पारवेकर, विजयराव खडसे, किशोर दर्डा, प्रदेश सचिव मुकुंद आमदरे, यवतमाळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या सव्वालाखे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तातू देशमुख आदी काँग्रेसची नेतेमंडळी उपस्थित होती.
शिवसेना-भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तानाजी सावंत यांनी विधान परिषदेसाठी नामांकन दाखल केले. यावेळी त्यांच्या समवेत ना.संजय राठोड, ना.मदन येरावार, खासदार भावना गवळी, आमदार अशोक उईके, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार राजू तोडसाम, माजी आमदार विश्वास नांदेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, दीपक निलावार आदी उपस्थित होते.
बुधवारी काँग्रेस व शिवसेनेसोबतच तीन अपक्ष उमेदवारांनीही आपले नामांकन दाखल केले आहे. त्यातील एकाला राष्ट्रवादीने समर्थन दिले आहे.
आज नामांकनाची छाननी
गुरुवारी नामांकन अर्जाची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन मागे घेता येणार आहे. १९ नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदान होणार असून, २२ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

काँग्रेसचा उमेदवार पहिल्यांदाच मतदारांमधून
४यवतमाळ जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच शंकर बडे यांच्या रूपाने मतदारांमधून उमेदवार मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने बडे यांना रिंगणात उतरविले आहे. काँग्रेसकडे सध्याच १६० चे संख्याबळ असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी श्याम उमाळकर यांनी पत्रपरिषदेत दिली. ते म्हणाले, जो मतदार तोच उमेदवार हा बदल पहिल्यांदाच होत असून ही संधी केवळ काँग्रेसने उपलब्ध करून दिली आहे. काँग्रेसचे उमेदवार शंकर बडे हे तीनदा पांढरकवडाचे नगराध्यक्ष राहिले असून ग्रामीण व शहरी कार्यकर्ता असलेला चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शिवसेनेने बाहेरचा उमेदवार दिला आहे. यावरून शिवसेना या निवडणुकीबाबत गंभीर दिसत नसल्याचे ते म्हणाले. बाहेरचा उमेदवार येथे टिकल्याचा इतिहास नसल्याचेही उमाळकर यांनी सांगितले.

शिवसेनेचा १६७ मतदारांचा दावा
४यवतमाळ विधान परिषदेचे शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या विजयाचा दावा पत्रपरिषदेत करण्यात आला आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, खासदार भावना गवळी यांनी पत्रपरिषदेला संबोधित करताना युतीच्या या उमेदवाराकडे १६७ मतदार असल्याचा दावा केला आहे. त्यात शिवसेनेचे ८७ तर भाजपाच्या ८० मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात दोन खासदार, सहा आमदार त्यातील दोन मंत्री एवढी मोठी फौज असल्याने शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय होणारच, असा विश्वासही ना.संजय राठोड यांनी व्यक्त केला. तर ना.मदन येरावार यांनी सर्व ४४० मतदार आपलेच असल्याचा अजब दावा केला. तानाजी सावंत हे शिवसेनेचे उपनेते असून अभियंते आहेत. त्यांनी कमी पाऊस पडणाऱ्या भूम, परांडा, वाशी या तालुक्यांमध्ये जलसंवर्धनासाठी मोठे काम केले आहे. त्याचे परिणाम आता दिसत आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेवूनच त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शिवसेनेने आणला ‘वजनदार’ उमेदवार
४शिवसेनेचे उमेदवार तानाजी सावंत (माढा जि.सोलापूर) हे आर्थिक, राजकीय व सामाजिकदृष्ट्या ‘वजनदार’ मानले जातात. विविध शैक्षणिक संस्था, साखर कारखान्यांचे मालक असलेल्या सावंत यांच्याकडे शंभर कोटींवर संपत्ती असल्याची चर्चा सेनेत आहे. सेनेच्या या उमेदवाराचे ‘वजन’ पाहून ‘तगडे’ दावे करणाऱ्या एका अपक्षाच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.

चार जागांवर राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार
४विधान परिषदेच्या सहापैकी चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे केले असून यवतमाळ व नांदेडमध्ये अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीने समर्थन दिल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रपरिषदेत दिली. अपक्ष उमेदवारीमुळे मतांची बेरीज वाढविणे सोपे जाते, असा दावा त्यांनी केला. काँग्रेससोबत आघाडीचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. मात्र, त्यांची भूमिका आडमुठी राहिल्याचे मुंडे यांनी सांगितले. यावेळी आमदार मनोहरराव नाईक, आमदार ख्वाजा बेग, वसुधाताई देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: Congress, Senna nomination for Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.