सभापतिपदावर काँग्रेस-राकाँचा झेंडा
By Admin | Updated: September 15, 2014 00:23 IST2014-09-15T00:23:37+5:302014-09-15T00:23:37+5:30
पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आपला झेंडा रोवला आहे. १५ पैकी सहा पंचायत समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रत्येकी चार तर

सभापतिपदावर काँग्रेस-राकाँचा झेंडा
लोकमत चमू ल्ल यवतमाळ
पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आपला झेंडा रोवला आहे. १५ पैकी सहा पंचायत समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रत्येकी चार तर एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली. नेर पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवार नसल्याने तेथील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. घाटंजीमध्ये भाजपाच्या मदतीने बंडखोर काँग्रेस उमेदवाराने सभापतीपदावर कब्जा केला. तर महागावमध्ये उपसभापतिपदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप डावलला. यामुळे तेथील राजकारण बदलण्याचे संकेत आहे. यवतमाळ पंचायत समितीत राष्ट्रवादीने आपला दबदबा कायम ठेवत सभापतिपद पाच सदस्यांच्या बळावर काजीब केले. विजयी उमेदवारांनी ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरात मिरवणुकी काढून विजयोत्सव साजरा केला.
यवतमाळात राष्ट्रवादीचा दबदबा
यवतमाळ पंचायत समितीमध्ये संख्याबळ काँग्रेसकडे सर्वाधिक असताना रविवारी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले. सभापतीपदी तिवसा गणातील गायत्री नरसिंग ठाकूर यांची अविरोध निवड झाली. पंचायत समितीत काँग्रेस सहा, राष्ट्रवादी पाच, शिवसेना दोन आणि मनसे एक असे पक्षीय बलाबल आहे. सर्वाधिक संख्याबळ असूनही काँग्रेसला उपसभापतीपदावर समाधान मानावे लागले. हिवरी गणातील नारायण बाचूसिंग राठोड यांची निवड झाली. यापूर्वी शिवसेनेच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीने सभापती पद मिळविले होते. आता काँग्रेससोबत आघाडी करून वरचष्मा कायम ठेवला. सभापतीपदाच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांची बैठक झाली. राष्ट्रवादीने यापूर्वी यवतमाळ शहरालगतच्या ग्रामीण भागात सभापतीपद दिले होते. आता विधानसभा असल्याने सभापतीपदी निवड करताना तालुक्याचा विचार करण्यात आला. शिवाय जिल्हा परिषदेतही वडगाव परिसरातूनच सभापती देण्याचे निश्चित असल्याने एकाच सर्कलमध्ये दोन पदे नको म्हणून हा सुवर्णमध्य साधला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अनुप खांडे यांनी काम पाहिले. यावेळी डॉ.एस.पी. ढोले उपस्थित होते.
वणी पंचायत समितीत शिवसेना
वणी पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे सुधाकर गोरे, तर उपसभापतीपदी भाजपाच्या रुपलता निखाडे यांची बिनविरोध निवड झाली. येथील सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते. या दोनही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज गोरे व निखाडे बिनविरोध निवडून आल्याचे तहसीलदार रणजित भोसले व सहायक विजय मत्ते यांनी घोषित केले.
मारेगाव सभापतीची निवड अविरोध
मारेगाव पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होते. या पदासाठी एकमेव शिवसेनेच्या सुनिता मेश्राम उमेदवार होत्या. त्यामुळे त्यांची बिनविरोध सभापतीपदी निवड झाली. उपसभापती पदासाठी कॉंग्रेसचे गजानन खापने आणि विद्यमान सभापती शिवसेनेच्या प्रतीभा आसुटकर यांनी अर्ज केले होते. या दोघांनाही समान दोन मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात खापने यांच्या बाजूने कौल मिळाल्याने ते उपसभापतीपदी विजयी झाल्याचे तहसीलदार डॉ.संतोष यावलीकर व सहायक नंदकिशोर कांबळे यांनी घोषित केले.