काँग्रेसचा सभापती, सेनेचा उपसभापती
By Admin | Updated: October 29, 2016 00:14 IST2016-10-29T00:14:11+5:302016-10-29T00:14:11+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे रवींद्र रामराव ढोक, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे गजानन गणपत डोमाळे यांची अविरोध निवड करण्यात आली.

काँग्रेसचा सभापती, सेनेचा उपसभापती
यवतमाळ बाजार समिती : रवींद्र ढोक, गजानन डोमाळे
यवतमाळ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे रवींद्र रामराव ढोक, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे गजानन गणपत डोमाळे यांची अविरोध निवड करण्यात आली. बाजार समिती कार्यालयात शुक्रवारी ही निवड प्रक्रिया पार पडली.
बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या परिवर्तन पॅनलने सर्वच १९ जागांवर विजय मिळविला होता. तत्पूर्वी पणन प्रक्रिया मतदार संघातून या पॅनलचे उमेदवार अविरोध विजयी झाले होते. उर्वरित १८ जागांवरही त्यांचेच उमेदवार विजयी झाले होते.
सभापती आणि उपसभापती पदांसाठी बाजार समिती कार्यालयात विशेष सभा घेतली. ढोक व डोमाळे यांनी अर्ज केले. विहित मुदतीत इतर कुणाचेही अर्ज प्राप्त न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रिता निनावे यांनी अविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
या विशेष सभेला संचालक राजेंद्र गिरी, सुरेश पात्रीकर, श्रीकांत डंभारे, संजय राठोड, छायाताई शिर्के, ललिताबाई जयस्वाल, सुनील डिवरे, प्रकाश राठोड, किशोर इंगळे, गुणवंत डोळे, रमेश भीसनकर, वसंत भेडेकर, सत्यभामा चव्हाण, किशोर बडे, विजय मुंधडा, राजेंद्र निमोदिया, राजेशकुमार अग्रवाल यांच्यासह बाजार समितीचे सचिव संजय भेंडारकर उपस्थित होते. निवडीनंतर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नरेश ठाकूर व शिवसेना नेते प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
एक तपानंतर झाले परिवर्तन
बाजार समितीवर गेली तब्बल १२ वर्षे भाजपाचे सूर्यकांत गाडे यांच्या गटाचे वर्चस्व होते. मात्र त्यांच्या कार्यकाळात बाजार समिती डबघाईस गेल्याचा आरोप करून परिवर्तनने निवडणूक लढविली. यात मतदारांनी त्यांना सहकार्य केल्याने एक तपानंतर बाजार समितीच्या सत्तेत परिवर्तन झाले आहे. नवीन पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याचे सांगितले.