जिल्हा बँकेत सर्वाधिक नऊ जागा काँग्रेस पक्षाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 05:00 AM2020-12-24T05:00:00+5:302020-12-24T05:00:01+5:30

जिल्हा बँकेच्या २१ पैकी नऊ जागा काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादीकडे चार, शिवसेना तीन, भाजप तीन व अपक्ष दोन असे संख्याबळ आहे. तालुका गटातील एका उमेदवाराने भाजप समर्थित शेतकरी सहकार विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढविली व जिंकलीसुद्धा.  मात्र हे चिन्ह पुढील घडामोडीत अडचणीचे ठरण्याची शक्यता पाहता त्यांनी आता आपण भाजप समर्थित नव्हे तर अपक्ष उमेदवार असल्याचे जाहीर करून शेतकरी सहकारी विकास आघाडीपासून फारकत घेतली आहे.

The Congress party has the highest number of nine seats in the district bank | जिल्हा बँकेत सर्वाधिक नऊ जागा काँग्रेस पक्षाला

जिल्हा बँकेत सर्वाधिक नऊ जागा काँग्रेस पक्षाला

Next
ठळक मुद्देनवा अध्यक्ष जानेवारीत ठरणार : राष्ट्रवादी काॅंग्रेसकडूनही मोर्चेबांधणी, अपक्षांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न

  राजेश निस्ताने
    लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर २१ पैकी १६ जागा जिंकून महाविकास आघाडीने वर्चस्व स्थापन केल्यानंतर आता अध्यक्ष कोण याची चर्चा होत आहे. १६ पैकी सर्वाधिक नऊ जागा काँग्रेसच्या असल्याने अध्यक्षपद काँग्रेसकडे जाईल, असे मानले जाते. मात्र राष्ट्रवादीनेही मोर्चेबांधणी चालविली असून अपक्षांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न रात्रीपासूनच सुरू केले आहेत. 
जिल्हा बँकेच्या २१ पैकी नऊ जागा काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादीकडे चार, शिवसेना तीन, भाजप तीन व अपक्ष दोन असे संख्याबळ आहे. तालुका गटातील एका उमेदवाराने भाजप समर्थित शेतकरी सहकार विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढविली व जिंकलीसुद्धा.  मात्र हे चिन्ह पुढील घडामोडीत अडचणीचे ठरण्याची शक्यता पाहता त्यांनी आता आपण भाजप समर्थित नव्हे तर अपक्ष उमेदवार असल्याचे जाहीर करून शेतकरी सहकारी विकास आघाडीपासून फारकत घेतली आहे. जिल्हा बँक अध्यक्ष पदासाठी ११ हा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. काँग्रेसची मंडळी एकजूट राहिल्यास आणखी दोन संचालक ओढून आणून अध्यक्षपद मिळविणे या पक्षासाठी कठीण नाही. मात्र काँग्रेसकडून अध्यक्ष पदासाठी नेमके कोणते नाव पुढे येते, त्या नावावर काँग्रेसमध्ये एकमत होते का, महाविकास आघाडीला सर्वसंमतीने हे नाव चालते का, हे मुद्देही तेवढेच महत्वाचे ठरतात. जिल्हा बँकेत २१ पैकी १५ संचालक हे कुणबी-मराठा आहेत. त्यामुळे बँकेत नवा अध्यक्ष मराठा की नॉन मराठा याचीही चर्चा होऊ लागली आहे. काँग्रेसमधीलच दोन नेत्यांनी आगामी अध्यक्ष नॉन मराठा आणि विशेषत: अल्पसंख्याकांमधून व्हावा यासाठी छुपी मोर्चेबांधणी चालविली आहे. काँग्रेसकडून अध्यक्ष पदासाठी अनुभवी चेहरा रिंगणात उतरविला जातो, की कुण्या नव्या चेहऱ्याला संधी दिली जाते, याकडे नजरा आहेत. 
चार सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही अध्यक्ष पदासाठी फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादीत अनुभवी नावे असली तरी त्यांच्या नावावर एकमत होणेही तेवढेच कठीण आहे. राष्ट्रवादीकडून अनुभवी नावावर शिक्कामोर्तब न झाल्यास अखेरच्या क्षणी नव्या चेहऱ्याला अनुकूल वातावरण निर्माण करण्याची व त्यासाठी लागणारे सहा-सातचे संख्याबळ खेचून आणण्याची जबाबदारी बँकेत एवढी वर्षे घोटाळे असो की कोर्ट-कचेऱ्यांमध्ये सतत पडद्यामागून सूत्रे हलविल्याने गाजलेल्या अनुभवी दिग्गजांवर दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निवडणुकीत अपक्ष व भाजपचे सदस्यही निर्णायक भूमिकेत राहू शकतात. 
महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा केली असता अद्याप काहीच ठरले नसल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकमेकांशी प्रामाणिक राहिल्यास संख्याबळानुसार अध्यक्षपद काँग्रेसकडे आणि उपाध्यक्षाची दोन पदे अनुक्रमे शिवसेना व राष्ट्रवादीकडे असे समीकरण बसविले जाऊ शकते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने रात्रीपासून अपक्षांशी सुरू केलेले संपर्क अभियान लक्षात घेता राष्ट्रवादीच्या गोटात अध्यक्ष पदासाठी चाचपणी सुरू असल्याचे दिसते. एखादवेळी काँग्रेसकडून अध्यक्ष पदासाठी पुढे केले जाणाऱ्या नावावर नाराजी दाखवून व फोडाफोडी करूनही राष्ट्रवादीकडून अध्यक्ष पदासाठी वेगळी खेळी खेळली जाण्याची शक्यता बँकेच्या वर्तुळात वर्तविली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत यावेळी बँकेचे अध्यक्ष पद पुसद विभागात नेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचेही बोलले जाते.
निकालानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाने १४ दिवसात या संबंधीची अधिसूचना जारी करणे बंधनकारक आहे. ते पाहता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अध्यक्ष पदाची निवडणूक होईल, असे सांगितले जात आहे. 
जिल्हा परिषद शिक्षकाची पहिल्यांदाच जिल्हा बँकेत एन्ट्री
 जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने पहिल्यांदाच बँकेत संचालक म्हणून एन्ट्री केली आहे. या एन्ट्रीसाठी मात्र त्यांना अखेरच्या क्षणी प्रचंड ‘कसरत’ करावी लागली. ही एन्ट्री आता अवैध ठरविण्यासाठीही कायदेशीर लढाईचा मार्ग अवलंबिला जाणार आहे.

Web Title: The Congress party has the highest number of nine seats in the district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.