काँग्रेसच्या कार्यकाळातील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

By Admin | Updated: December 18, 2014 23:02 IST2014-12-18T23:02:25+5:302014-12-18T23:02:25+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांवर करण्यात आलेल्या नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Congress nominee cancels termination | काँग्रेसच्या कार्यकाळातील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

काँग्रेसच्या कार्यकाळातील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

जिल्हा नियोजन समिती : नव्या नियुक्त्यांसाठी हवेत पालकमंत्री
यवतमाळ : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांवर करण्यात आलेल्या नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. शासनाने १७ डिसेंबर रोजी या संबंधीचे आदेश जारी केले आहे.
जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार प्रस्ताव शासनाकडे पाठवायचे आहेत. मात्र शासनाने अद्याप पालकमंत्र्यांच्या नियुक्त्याच केलेल्या नाहीत. आधी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यात होतील त्यानंतर जिल्हा नियोजन समितीवर कुणाला घ्यायचे याच्या शिफारसी केल्या जाणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कार्यकाळात जिल्हा, तालुका समित्या, मंडळ-महामंडळे यावरील नियुक्त्यांचा वाद संपूर्ण पाच वर्ष सुरू होता. अनेक महामंडळांवर तर सरकारचा कार्यकाळ पूर्ण होऊनही नियुक्त्या झाल्या नाही. त्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील आपसी वाद कारणीभूत ठरला होता. काही समित्यांवर अखेरच्या सहा महिन्यात नियुक्त्या केल्या गेल्या. आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळातील तीन-चार जागांप्रमाणेच अनेक तालुका, जिल्हा समित्यांसह मंडळ-महामंडळांवरील काही जागाही अखेरपर्यंत रिक्त ठेवल्या गेल्या. पक्षांतर्गत बंडखोर व नाराज कार्यकर्त्यांना याच रिक्त पदांचे अखेरपर्यंत गाजर दाखविले गेले. या रिक्त जागा भरणे काँग्रेस सरकारने नियोजनपूर्वक टाळले होते.
आता राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार आपल्या कार्यकर्त्यांच्या विविध समित्या, मंडळ-महामंडळांवर तत्काळ नियुक्त्या करते की त्यांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करायला लावते याकडे लक्ष लागले आहे. सरकार हिवाळी अधिवेशनाला सामोरे जाऊनही अद्याप पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या नाहीत. ते पाहता युती सरकारचा कारभारही आघाडी सरकारप्रमाणेच तर राहणार नाही ना अशी हूरहूर कार्यकर्त्यांना लागली आहे.
युती शासनाने काँग्रेसच्या कार्यकाळातील जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्यांच्या जुन्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. याच प्रमाणे जिल्हास्तरावरील व तालुका स्तरावरील अन्य समित्याही रद्द होणार आहे. तेथे भाजपा-शिवसेना पक्षाच्या विचाराच्या कार्यकर्त्यांना नियुक्त्या दिल्या जाणार आहे. नव्या नियुक्त्यांच्या शिफारसी पालकमंत्री करतील. मात्र सध्या पालकमंत्रीच अस्तित्वात नसल्याने या नियुक्त्या लांबण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Congress nominee cancels termination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.