सावळी सर्कलमध्ये काँग्रेसला गळती
By Admin | Updated: January 11, 2017 00:38 IST2017-01-11T00:38:37+5:302017-01-11T00:38:37+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सावळी सर्कलमध्ये पक्ष प्रवेश सोहळ्यांचे प्रमाण वाढले आहे.

सावळी सर्कलमध्ये काँग्रेसला गळती
पक्ष प्रवेश सत्र : निवडणुकीच्या तोंडावर सोहळे वाढले
सुरेश पवार सावळीसदोबा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सावळी सर्कलमध्ये पक्ष प्रवेश सोहळ्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने या भागातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहे. जिल्हा परिषद सदस्य सोनबा मंगाम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढल्याचे सांगितले जाते.
सावळी-पळशी जिल्हा परिषद गट, सावळी व पळशी पंचायत समिती गणावरही काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. याच गटातील सोनबा मंगाम यांनी आता काँग्रेस सोडली आहे. यापूर्वी प्रकाश डोमा राठोड (कृष्णनगर), नूरसिंग राठोड (चिचबर्डी), अनिल बन्सोड (कापेश्वर), खांदवे (वरूड भ) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. यामुळे सावळी-इचोरा जिल्हा परिषद गटात निवडणुकीपूर्वीच भाजपाने काँग्रेससमोर आव्हान उभे केले आहे.
या गटामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना अशी प्रथमच चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. पक्ष प्रवेशाचा फायदा नेमका कुणाला होणार हे आज सांगता येत नसले तरी सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक आव्हान देणारी ठरणार आहे. काँग्रेसमधील आणखी काही मंडळी बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते. तथापि सावळी-इचोरा गटासाठी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी अनेकांच्या नावाची चर्चा आहे. शिवाय भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसही तगड्या उमेदवारांचा शोध घेत आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीचाही उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे. इचोरा व सावळी पंचायत समिती गणातून निवडणूक लढणाऱ्यांचीही यादी लांबलचक आहे. प्रत्येक पक्षातील इच्छुकांची उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ सुरू आहे.