प्रदेशाध्यक्षांच्या दिग्रस मतदारसंघात काँग्रेस पोकळ
By Admin | Updated: August 1, 2014 00:28 IST2014-08-01T00:28:33+5:302014-08-01T00:28:33+5:30
दारव्हा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक नानासाहेब देशमुख यांनी गुरुवारी येथे बैठक बोलविली होती. दिग्रस-दारव्हा-नेर या तीन तालुक्यातून काँग्रेसचे

प्रदेशाध्यक्षांच्या दिग्रस मतदारसंघात काँग्रेस पोकळ
माजी राज्यमंत्र्यांचा घरचा अहेर : निरीक्षकांपुढे केवळ शंभर कार्यकर्ते
दिग्रस-दारव्हा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक नानासाहेब देशमुख यांनी गुरुवारी येथे बैठक बोलविली होती. दिग्रस-दारव्हा-नेर या तीन तालुक्यातून काँग्रेसचे केवळ शंभर कार्यकर्ते निरीक्षकांपुढे उपस्थित असल्याने एकूणच मतदारसंघातील पक्ष बांधणी व संघटनात्मक स्थितीची जाणीव त्यांना झाली. यावेळी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. काँग्रेसच्या नेत्यांचे पक्ष आणि कार्यकर्त्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच दिग्रस-दारव्हा मतदारसंघात काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. पक्षाच्या या दुरावस्थेला नेते मंडळी जबाबदार आहे. पक्षात सध्या चापलूस कार्यकर्त्यांचा भरणा अधिक असून त्यांच्याकडून नेत्यांचे कान भरले जातात. त्यामुळे पक्षाचे वाटोळे झाले आहे. प्रदेशाध्यक्षांचा मतदारसंघ असलेल्या दिग्रस-दारव्हा-नेरमध्ये काँग्रेस दिवसेंदिवस आणखी पोकळ होत चालली असल्याचे संजय देशमुख म्हणाले. यावेळी अन्य कार्यकर्त्यांनीही नेत्यांच्या कारभाराबाबत तक्रारी केल्याने ही बैठक चांगलीच गाजली. तोच धागा संजय देशमुख यांनी पकडल्याने कार्यकर्त्यांच्या तक्रारींना बळ मिळाले. संजय देशमुखांच्या या आक्रमक भूमिकेने काँग्रेसच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. संजय देशमुख यांना विधानसभा लढवायची आहे. गतवेळी त्यांनी दिग्रस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळविली होती. मात्र ते पराभूत झाले. माणिकरावांनी आपले काम केले नाही, असा त्यांचा खासगीतील नेहमीचाच सूर असतो. यावेळी त्यांनी दिग्रस सोबतच यवतमाळचाही पर्याय ठेवला आहे. मात्र माणिकराव चित्र स्पष्ट करीत नसल्याची तक्रार संजय देशमुख यांनी दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांपुढे दारव्हा येथे बोलून दाखविली. माणिकरावांप्रती मनात खदखदणाऱ्या असंतोषाला अखेर त्यांनी गुरुवारी पक्ष निरीक्षकांपुढे वाट मोकळी करून दिली.