काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी मात्र चढाओढ कायम
By Admin | Updated: May 17, 2015 00:21 IST2015-05-17T00:21:38+5:302015-05-17T00:21:38+5:30
काँग्रेस पक्षावर मरगळ आली असली तरी या पक्षाचा जिल्हाध्यक्ष होण्यासाठी मात्र नेते मंडळींमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळत...

काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी मात्र चढाओढ कायम
काँग्रेस पक्षावर मरगळ आली असली तरी या पक्षाचा जिल्हाध्यक्ष होण्यासाठी मात्र नेते मंडळींमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे. त्यात विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना पर्याय म्हणून उमरखेडचे माजी आमदार विजयराव खडसे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. मात्र ‘काँग्रेसमध्ये येऊन मला पश्चाताप होतोय, मी अपक्षच बरा होतो’ या संजय देशमुख यांनी अलिकडेच केलेल्या विधानाचे पक्षस्तरावर ‘मार्केटिंग’ करून त्यांचा पत्ता काटण्याचा प्रयत्न काँग्रेसमध्ये अन्य स्पर्धकांकडून सुरू आहे. याशिवाय आणखीही काही नावे चर्चेत आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी पुन्हा आपल्या मर्जीतील दोन मराठ्यांची नावे जिल्हाध्यक्षपदासाठी पुढे केली असून त्यासाठी नांदेडमार्गे मोर्चेबांधणीही चालविली आहे. मात्र नवा जिल्हाध्यक्ष हा ‘नॉन-मराठा’ व्हावा असा बहुतांश नेत्यांचा सूर असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगितले जाते. अनेक नेते घरात बसलेले असताना पुरके मात्र मतदारसंघात असंतुष्ट-विरोधकांच्या भेटीगाठी घेत आहे. जिल्ह्यात पक्षामध्ये स्वत:ला वेगळ्या पद्धतीने सिद्ध करायचे असल्याने त्यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी फिल्डींग लावल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसच्या एका नेत्याने ‘जिल्हाध्यक्ष कुणीही व्हा मात्र आगामी विधान परिषद निवडणूक मीच लढणार’ अशी मनिषा खासगीत नेत्यांसमोर बोलून दाखविली. त्या दृष्टीने त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. स्वत: परिषदेवर जाऊन विधानसभेत मुलाचे पुनर्वसन करण्याचा या नेत्याचा मनसुबा आहे. ‘बिग बजेट’ निवडणुकीसाठी ‘बजेट’ची तयारीही त्यांनी केल्याचे बोलले जाते.