काँग्रेसने मागितले ‘एमएलसी’साठी अर्ज
By Admin | Updated: June 11, 2016 02:47 IST2016-06-11T02:47:32+5:302016-06-11T02:47:32+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषद सदस्य निवडण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने जिल्ह्यातून इच्छूकांना उमेदवारी अर्ज मागविले आहे.

काँग्रेसने मागितले ‘एमएलसी’साठी अर्ज
राष्ट्रवादी काँग्रेसला शह : जिल्हा काँग्रेसच्या गोटात उत्साह
ंयवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषद सदस्य निवडण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने जिल्ह्यातून इच्छूकांना उमेदवारी अर्ज मागविले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या जागेवर काँग्रेस उमेदवार देणार, हे निश्चित मानले जात आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीने इच्छूकांना आपल्याकडे अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यवतमाळ मतदारसंघातून २०१० मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप बाजोरिया यांना उमेदवारी दिली होती. यापूर्वीसुद्धा हा मतदारसंघ मागील चार टर्मपासून राष्ट्रवादीच्या वाट्यावर सोडण्यात आला आहे. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. त्यानंतर अनेक घडामोडी जिल्ह्यात झाल्या. आता तर काँग्रेसकडून विधान परिषद लढण्याबाबतचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
विधान परिषदेची निवडणूक ही आॅक्टोबरमध्ये होत असली तरी आतापासूनच त्यासाठी चाचपणी सुरू आहे. वरिष्ठ स्तरावरच्या वाटाघाटीत काँग्रेसने यवतमाळ मतदारसंघ मिळविल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या गोटात सध्यातरी उत्सुकतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यात काँग्रेसकडे माजी पदाधिकाऱ्यांची मोठी फौज आहे. यातूनही अनेक जण विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्यास इच्छूक आहेत. विधान परिषदेची निवडणूक लढण्यासाठी आर्थिक सुबत्ता हीच महत्त्वाची पात्रता मानली जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)