गहाण दागिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 02:32 PM2019-09-13T14:32:10+5:302019-09-13T14:35:04+5:30

एकट्या अमरावती विभागाचा विचार केल्यास ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंत परवाना क्षेत्राबाहेर परंतु जिल्ह्यात गहाण दागिन्यांवर कर्ज देणाऱ्या सावकारांची संख्या पाच जिल्ह्यात ४४१ एवढी आहे.

Confusion about debt waiver of mortgage farmers | गहाण दागिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत संभ्रम

गहाण दागिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत संभ्रम

Next
ठळक मुद्देस्पष्ट आदेशाची प्रतीक्षा पाच वर्षांपूर्वीची यादी, सावकाराच्या कार्यक्षेत्राबाहेरील कर्ज

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सोन्या-चांदीचे दागिने परवाना प्राप्त सावकाराकडे तारण ठेऊन शेतकऱ्यांनी खरीप-रबी हंगामात शेतीसाठी कर्ज उचलले. मात्र या कर्जाची माफी देताना आता नेमका कोणता निकष लावला जाईल, याबाबत सहकार प्रशासनात संभ्रमाची स्थिती पाहायला मिळते.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-सेना युती सरकारने दोन दिवसांपूर्वीच्या कॅबिनेट बैठकीत तब्बल ३७ निर्णय घेतले. त्यात परवाना प्राप्त सावकाराच्या कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचाही निर्णय घेतला गेला. या निर्णयानंतर सहकार प्रशासनात या कर्जाचा ताळेबंद जुळविण्याची धडपड सुरू झाली. परंतु अद्याप स्पष्ट आदेश जारी न झाल्याने सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांयांमध्येही किती शेतकऱ्यांना नेमक्या किती रकमेची कर्जमाफी मिळणार याबाबत संभ्रमाची स्थिती पाहायला मिळेत आहे.
आजच्या घडीला सहकार प्रशासनाकडे ३० नोव्हेंबर २०१४ ला बनलेली यादी उपलब्ध आहे. त्यावेळी शेतकऱ्यांनी सराफ-सुवर्णकार अर्थात परवाना प्राप्त सावकारांकडे (मनीलेंडर्स) तारण ठेवलेल्या दागिन्यांवरील कर्जाचा हिशेब केला गेला होता. अनेक महिनेपर्यंत या सावकारांचे अभिलेखे ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली गेली होती. सावकारांना सहनिबंधकांनी समक्ष पाचारण करून हिशेबाची खातरजमा केली होती. या संपूर्ण तपासणीनंतर सहकार प्रशासनाने सरकारला अहवाल सादर केला. त्यात सावकाराच्या परवाना क्षेत्राबाहेरील परंतु जिल्ह्यांतर्गत आणि परवाना क्षेत्राबाहेरील पण जिल्ह्याच्या बाहेर अशा दोन प्रकारात यादी बनविली गेली होती. या यादीतील कर्जमाफी गेल्या पाच वर्षांपासून सरकारच्या विचाराधीन होती. अखेर त्याला मुहूर्त भेटला व कॅबिनेटमध्ये निर्णय झाला. आता या निर्णयानुसार शासन आदेश (जीआर) जारी होण्याची सहकार प्रशासनाला प्रतीक्षा आहे.

अमरावती विभागाचा आकडा ४४ कोटी
एकट्या अमरावती विभागाचा विचार केल्यास ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंत परवाना क्षेत्राबाहेर परंतु जिल्ह्यात गहाण दागिन्यांवर कर्ज देणाऱ्या सावकारांची संख्या पाच जिल्ह्यात ४४१ एवढी आहे. त्यांनी ३९ हजार २१२ शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. या कर्जाची रक्कम ४३ कोटी २७ लाख ५९ हजार एवढी आहे.
परवान्याच्या हद्दीबाहेर आणि बाहेरील जिल्ह्यात कर्ज वाटणाऱ्या सावकारांची संख्या ११६, शेतकरी संख्या एक हजार ५३१, तर कर्जाची रक्कम एक कोटी ३८ लाख १८ हजार एवढी आहे.
जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील मिळून परवाना प्राप्त सावकार एकुण ५४१, कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या ४० हजार ७४३, तर कर्जाची रक्कम ४४ कोटी ६५ लाख ७६ हजार एवढी होत आहे.
सरसकट माफी मिळाल्यास अमरावती विभागात ४४ कोटी ६५ लाखांची माफी मिळण्याची शक्यता सहकार प्रशासनात व्यक्त केली जात आहे.

सावकाराच्या परवाना क्षेत्राबाहेरील कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी त्याबाबत नेमके आदेश जाहीर झालेले नाहीत. नेमके कोणते कर्ज ग्राह्य धरायचे, त्यावर व्याज किती हे स्पष्ट झाल्यानंतरच माफीचा नेमका आकडा सांगणे शक्य होणार आहे.
- राजेश दाभेराव, विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था), अमरावती

Web Title: Confusion about debt waiver of mortgage farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी