कफल्लक माजी शिक्षणाधिकाऱ्यांचा सन्मानासाठी संघर्ष
By Admin | Updated: September 7, 2016 01:22 IST2016-09-07T01:22:15+5:302016-09-07T01:22:15+5:30
मंगळवारी जिल्हा परिषदेत शिक्षक पुरस्कारांचे वितरण झाले, तेव्हा शिक्षकांच्या चारचाकी गाड्यांनी परिसर

कफल्लक माजी शिक्षणाधिकाऱ्यांचा सन्मानासाठी संघर्ष
राजकीय नेत्याने केला घात : न्यायालयात जिंकले, आता समाजाच्या कोर्टात हवा न्याय
अविनाश साबापूरे यवतमाळ
मंगळवारी जिल्हा परिषदेत शिक्षक पुरस्कारांचे वितरण झाले, तेव्हा शिक्षकांच्या चारचाकी गाड्यांनी परिसर गजबजून गेला. त्याचवेळी ८० वर्षांचे निवृत्त शिक्षणाधिकारी मात्र साध्या जुनाट स्कुटीवरून प्रसिद्धी माध्यमांच्या कार्यालयांचे पत्ते धुंडाळत होते. शिक्षक हारतुरे स्वीकारत असताना हा त्यांचा ‘माजी साहेब’ सन्मानासाठी संघर्ष करीत होता. निवृत्त होण्याच्या तीन दिवसांआधीच त्यांना खोट्या केसमध्ये अडकवून कारवाई करण्यात आली होती. १९९५ मधली ही घटना सांगताना त्यांचे खोल गेलेले डोळेच बोलत होते.
साधा शिक्षकही चारचाकीतून फिरतो. अशावेळी संपूर्ण जिल्ह्याचा ‘बॉस’ राहिलेल्या निवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याची स्वारी जुनाट स्कुटीवर का, या औत्सुक्यातूनच ‘लोकमत’पुढे आला प्रशासनातील राजकीय हस्तक्षेपाचा वास्तव चेहरा. साधा शर्ट, चुरगळलेली पँट, दाढीचे खुंट वाढलेले, टोंगळ्यात वेदना असल्याने अडखळणारी पावले, हाती घरच्याच कापडातून शिवलेली पिशवी, त्यात घरूनच आणलेली पाण्याची बाटली... हे वर्णन एखाद्या गरीब शेतकऱ्याचे नव्हे बरं का! आपल्याच यवतमाळात जिल्हा शिक्षणाधिकारी राहिलेल्या संघर्षशील माणसाची ही अवस्था आहे. हरिश्चंद्र कणीराम जाधव हे त्यांचे नाव. वय ८० वर्षे! खोल गेलेल्या डोळ्यांना शोध आत्मसन्मानाचा!
१९९२ ते १९९५ या चार वर्षात एस. के. जाधव यवतमाळ येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. कोणत्याही ‘वरकमाई’च्या फंदात ते पडले नाही. निवृत्त होईपर्र्यंत यवतमाळात त्यांचे घरही नव्हते. उलट आपल्याच पगारातून कधी कधी त्यांना सरकारमधील सदस्यांसाठी खर्च करावा लागत होता. जाधव यांनी सांगितले, सरकारमधील सदस्यांचा दौरा असला की, आम्हाला पैसे द्यावे लागायचे. मी कुठून देणार? मग पगाराचेच पैसे देऊन टाकायचो... अशी ही व्यक्ती ‘स्वच्छ’ मनाने निवृत्त होणार होती. पण निवृत्त होण्याच्या तीन दिवसांपूर्वीच राजकारणाने त्यांना डाग लावला.
जाधव यांनी सांगितले की, त्यावेळी पांढरकवडा येथील केईएस शाळेतील सेंगर नामक शिक्षकाला मुख्याध्यापक करण्याचा ठरावा आला होता. तो नियमानुसार होता, त्यानुसार मी मान्यताही दिली. मात्र, तत्कालीन सरकारमध्ये सदस्य राहिलेल्या राजकीय नेत्याने दुसऱ्याच एका शिक्षकाला मुख्याध्यापक करण्याचा आग्रह धरला. तो नियमात नव्हता. त्यामुळे मी नकार दिला. त्यानंतर पांढरकवडा येथील विश्रामगृहात मला बोलावून दबाव टाकण्यात आला. हा गैरप्रकार करण्यास मी नकार दिल्याने ते चिडले. शिक्षणाधिकाऱ्याने सरकारच्या सदस्याला अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा माझ्यावर आरोप लावण्यात आला. खोटी केस करून मला अटक करण्यात आली. पण पुरावाच नसल्याने त्यातून मी निर्दोष सुटलो. निवृत्तीच्या वेळी डाग मात्र लागला. काही दिवस शासनाने माझा पैसाही रोखला. माझे मूळगाव वाई बाजार येथील शेत विकून घर बांधावे लागले. आपण निर्दोष असल्याचे ते लोकांना पटवून देतात...
निवृत्त शिक्षणाधिकाऱ्याचा हा संघर्ष गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. या अपमानाविरुद्ध शेवटी जाधव यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. सुरूवातीला त्यांना अपयश आले. पण ते लढत राहिले. नुकताच आॅगस्टमध्ये या खटल्याचा निकाल लागला. निवृत्त शिक्षणाधिकारी यांच्या बाजूने सन्मानजनक निर्णय न्यायालयाने दिला. निलंबित केल्याबद्दल नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.