चेतना अभियानातील मदत वाटपात दुजाभाव

By Admin | Updated: July 13, 2016 03:08 IST2016-07-13T03:08:20+5:302016-07-13T03:08:20+5:30

बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात गावागावात संकटात असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत, मार्गदर्शन व दिलासा

Conflict in the distribution of support to the Chetna campaign | चेतना अभियानातील मदत वाटपात दुजाभाव

चेतना अभियानातील मदत वाटपात दुजाभाव

समित्या निष्क्रिय : प्रशासन म्हणते, लेखी तक्रारी करा
यवतमाळ : बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात गावागावात संकटात असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत, मार्गदर्शन व दिलासा मिळावा या हेतुने तब्बल १८४८ ग्रामसमित्या निर्माण करण्यात आल्या आहेत. परंतु या समित्यांकडून मदत वाटपात दूजाभाव होत असल्याचा सूर आता ग्रामीण जनतेतून निघू लागला आहे.
सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य उंचाविण्यासाठी शासनाकडून या दोन जिल्ह्यांमध्ये बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवर समित्या निर्माण करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना गावातच सर्वप्रकारची मदत मिळावी, या हेतुने यवतमाळ जिल्ह्यात गावागावात १८४८ समित्या स्थापन करण्यात आल्या. या समितीचा अध्यक्ष सबंधित गावातील सरपंच व सचिव म्हणून ग्रामसेवक काम पाहत आहे. समितीमध्ये गावातील इतर नागरिकांचाही समावेश आहे. कोणत्याही गावात शेतकरी आत्महत्या होऊ नये, याची महत्वाची जबाबदारी त्या गावातील सबंधित समितीकडे आहे.
गावातील कुण्याही नैराश्यग्रस्त शेतकऱ्याची माहिती काढून त्याला तातडीने आवश्यक ती आर्थिक, मानसिक मदत या समितीद्वारे करण्यात यावी, असे निर्देश आहेत. त्यासाठी प्रत्येक समितीला एक लाख रुपये खर्चाची मूभा देण्यात आली असून पैसेही त्यांच्या सुपूर्द करण्यात आले आहे. परंतु आता हे पैसे वाटपात समितीकडून दूजाभाव होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गावातीलच नागरिक तक्रारी करीत आहेत. आपल्या जवळच्या अथवा नातेवाईकांनाच समित्या पैसे वाटप करीत आहेत, त्यामुळे गरजू शेतकरी वंचित राहत आहे, तसेच ठरवून दिलेल्या निकषांची पायमल्ली करून या पैशाचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आहेत.
या समित्यांवर सबंधित गटविकास अधिकारी व इतरांचा पाहिजे तसा वॉच दिसून येत नाही. समित्यांच्या संपर्कात तालुका पातळीवरील अधिकारी नाहीत. त्यामुळे या समित्या नेमक्या काय करीत आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. बोटावर मोजण्याइतपत समित्या सोडल्या तर उर्वरित ग्राम समित्यांचे कामकाज ढेपाळले आहे.
समित्यांच्या स्थापनेपासून किती व कोणत्या गरजू शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत करण्यात आली याची माहितीसुद्धा उपलब्ध करून दिल्या गेली नाही. त्यामुळे शासनाने ज्या हेतुने बळीराजा चेतना अभियान यवतमाळ जिल्ह्यात राबविणे सुरू केले आहे, त्या हेतुलाच कुठेतरी हरताळ फासल्या जात असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)
 

Web Title: Conflict in the distribution of support to the Chetna campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.