लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : वसंत सहकारी साखर कारखान्याकडे असलेल्या ४० कोटींच्या थकबाकीपोटी जप्तीसाठी आलेल्या पथकाला ऊस उत्पादक आणि कामगारांनी घेराव घालून जप्तीचा प्रयत्न मंगळवारी हाणून पाडला. यावेळी अधिकारी आणि कामगारात शाब्दीक चकमक झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.वसंत सहकारी साखर कारखान्याला गळीत हंगामासाठी २०११ ते २०१५ या काळात जिल्हा बँकेने कर्ज दिले होते. त्या कर्जाची परतफेड झाली नाही. त्यामुळे व्याजासह ही रक्कम ४० कोटींच्या घरात पोहोचली. वसुलीसाठी जिल्हा बँकेने दोन महिन्यापूर्वी वसंत साखर कारखान्याला जप्तीची नोटीस बजावली होती. परंतु दोन महिन्यात एक रुपयाही भरला नाही.शेवटी बँकेने जप्तीचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी दुपारी बँकेचे वसुली अधिकारी डी.सी. राठोड, नाना जळगावकर, प्रशांत दरोळे, व्ही.एन. तंबाखे कारखाना साईडवर पोहोचले. जप्तीसाठी अधिकारी आल्याचे माहीत होताच शेकडो ऊस उत्पादक, कामगार या ठिकाणी पोहोचले. त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. त्यावेळी अधिकारी व कामगारात शाब्दीक चकमक झाली. यावेळी भीमराव चंद्रवंशी, विलास चव्हाण, बालाजी वानखडे, पंडितराव शिंदे, लक्ष्मणराव जाधव, युवराज बंडगर, तातेराव चव्हाण, बळवंतराव चव्हाण यांच्यासह कामगार संघटनेचे पी.के. मुडे, व्ही.एम. पतंगराव यांनी कडवा विरोध केला. त्यामुळे जप्ती पथक आल्यापावली परत गेले.
बँकेच्या जप्ती पथकाला ऊस उत्पादकांचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 22:57 IST
वसंत सहकारी साखर कारखान्याकडे असलेल्या ४० कोटींच्या थकबाकीपोटी जप्तीसाठी आलेल्या पथकाला ऊस उत्पादक आणि कामगारांनी घेराव घालून जप्तीचा प्रयत्न मंगळवारी हाणून पाडला.
बँकेच्या जप्ती पथकाला ऊस उत्पादकांचा घेराव
ठळक मुद्देशेतकरी आक्रमक : ‘वसंत’वरील जप्ती हाणून पाडली