अन मतदारांच्या घरी पोहोचली मिठाई
By Admin | Updated: October 29, 2016 00:17 IST2016-10-29T00:17:18+5:302016-10-29T00:17:18+5:30
पालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. उमेदवारांनी निश्चित केलेल्या स्वत:च्या प्रभागातील मतदार याद्या तपासून संपर्क सुरू केला आहे.

अन मतदारांच्या घरी पोहोचली मिठाई
नगरपरिषद : अनेकांना घडले लक्ष्मीदर्शन
यवतमाळ : पालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. उमेदवारांनी निश्चित केलेल्या स्वत:च्या प्रभागातील मतदार याद्या तपासून संपर्क सुरू केला आहे. सोबतच मतदारांना आकृष्ट करण्यासाठी विविध फंडे वापरले जात आहे. एका उमेदवाराने तर प्रभागातील नागरिकांना मिठाई पोहोचवून आपल्या शैलीचा परिचय मतदारांना करून दिला आहे.
नगपरिषदेत पैशाची लयलूट करण्यास प्रसिध्द असलेल्या या उमेदवाराने आता स्टेट बॅक भागातील एका प्रभागातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्याने चक्क मिठाई भेट देण्याचा उपक्रम चालविला आहे. रसगुल्ले, लाडू असलेला मिठाईचा डब्बा घरोघरी देण्यात आला. मिठाई कोणी पाठवली असेल असा प्रश्न स्वीकारणाऱ्या व्यक्तीला पडू लागला आहे. काहींनी तर ही मिठाई घेण्यास स्पष्ट नकार दिला.
दिवाळीत मताचा गोडवा मिळविण्यासाठी धडपडत असलेल्या या उमेदवाराने निवडलेला फंडा अनेकांना धक्का देणार आहे. हा नियमबाह्य प्रकार सुरू असला तरी उघड तक्रार करण्यास कोणी तयार नाही. नगरपरिषद वर्तुळातील धनदांडग्या या उमेदवाराने राजकीय सुरुवातही हात पकडून केली. नंतर घड्याळ हातात घेतले, आता कमळाचा गंध घेण्याचा तयारी सुरू आहे. कोणत्याही पक्षाचे तिकिट मिळविण्यासाठी हा उमेदवार किती मोठी आर्थिक जबाबदारी स्वीकारण्यास तत्पर असतो. त्यामुळे त्याला तिकिटासाठी कोणत्याच पक्षाकडून नकार मिळाला नाही, हे विशेष. भाजपाकडून आपण लढणार हे जाहीर केले असून या उमेदवाराने आपल्या शैलीत प्रचार सुरू केला आहे. काही भागात तर मिठाई सोबत अनेकांना लक्ष्मीदर्शन घडले. लक्ष्मी दर्शन होत असल्याची माहिती मिळताच पिंपळगाव परिसरातील लक्ष्मी भक्तांनी उमेदवाराच्या घरी मोठी गर्दी केली होती. शेवटी जमाव वाढत असल्याने हा प्रकार थांबवावा लागला. या परिसरात मिठाई वाटपाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक कार्यकर्ते तर निवडणूक ‘कॅश’ करण्यासाठी या उमेदवाराच्या मागेपुढे पिंगा घालत आहे. अशाच पेड कार्यकर्त्यांच्या भरवशावर ‘माहोल’ जमविण्यात या उमेदवाराचा हातखंड आहे. सदर उमेदवाराने या माध्यमातून आपल्या निवडणूक शैलीचा परिचय दिला आहे. मात्र यात तो किती यशस्वी होतो आणि कुणी या प्रकाराची तक्रार करतो काय, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)