वहिखात्याच्या जागी आले संगणक
By Admin | Updated: March 15, 2015 00:28 IST2015-03-15T00:28:57+5:302015-03-15T00:28:57+5:30
चेंबर आॅफ कॉमर्सची सभा आणि व्यापाऱ्यांचा होळी स्नेहमिलन सोहळा गुरूवारी येथील फुलचंदजी कोठारी जैन भवनात पार पडला.

वहिखात्याच्या जागी आले संगणक
आर्णी : चेंबर आॅफ कॉमर्सची सभा आणि व्यापाऱ्यांचा होळी स्नेहमिलन सोहळा गुरूवारी येथील फुलचंदजी कोठारी जैन भवनात पार पडला. चेंबर आॅफ कॉमर्सचे जिल्हाध्यक्ष अरुणभाई पोबारू अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून चेंबर आॅफ कॉमर्सचे जिल्हा सचिव मधुसूदन भुतडा, कोषाध्यक्ष प्रशांत बनगिनवार, आर्णी तालुकाध्यक्ष कांतीलालजी कोठारी, कार्याध्यक्ष भिखुभाई पटेल, सचिव अजय छल्लानी, कोषाध्यक्ष फारूक धारीवाला आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष पोबारू म्हणाले, आज व्यवसायाच्या नोंदीमध्ये बरेच बदल झालेले आहे. पूर्वीची वहीखात्याची पद्धत मागे पडून संगणकीकृत कामे सुरू झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना या बाबीचे ज्ञान आवश्यक आहे. सेलटॅक्स, इन्कमटॅक्स आणि परवाना पद्धती आॅनलाईन झाली आहे. हिच व्यापाऱ्यांची कमकुवत बाजू आहे. याचाच फायदा शासनातील एक वर्ग घेत आहे. नियम आणि कायद्याची योग्य माहिती घेऊन आपले व्यवहार चोख आणि व्यवस्थित ठेवावे अशी विनंती त्यांनी केली.
प्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले. नगरपरिषदेने व्यापाऱ्यांच्या इमारतींवर आकारलेल्या अवास्तव करावरही या सभेत चर्चा झाली. जास्तीत जास्त अपील व्यापाऱ्यांनी दाखल करावे असे यावेळी सुचविण्यात आले. प्रसंगी प्रशांत लिंगावार, रियाज बेग आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)