‘एमओ’ला सक्तीची रजा
By Admin | Updated: June 11, 2015 02:24 IST2015-06-11T02:24:59+5:302015-06-11T02:24:59+5:30
येथील ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी कांबळे कर्तव्य काळात रूग्णालयात उपस्थित नव्हत्या.

‘एमओ’ला सक्तीची रजा
सर्पदंश : चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू
वणी : येथील ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी कांबळे कर्तव्य काळात रूग्णालयात उपस्थित नव्हत्या. त्यामुळे मार्डी येथील सर्पदंश झालेल्या अनामिका कोटरंगे या १० वर्षीय बालिकेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी डॉ.कांबळे यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर जाण्याचा आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राठोड यांनी दिला.
मार्डी येथील अनामिका सुनील कोटरंगे या १० वर्षीय बालिकेला मंगळवारी दुपारी सर्पदंश झाला. तिला प्रथम मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिला वणी येथे ‘रेफर’ केले. त्यासाठी तेथील डॉक्टरांनी त्वरित वाहन उपलब्ध करून दिले. तिचे आई-वडील अनामिकाला घेऊन दुपारी १ वाजता येथील ग्रामीण रूग्णालयात पोहोचले. मात्र त्यावेळी रूग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे तिच्यावर तत्काळ उपचार होऊ शकले नाही. मंगळवारी दुपारी तेथे डॉ.माधुरी कांबळे यांची ड्युटी होती. त्या उपस्थित नव्हत्या. परिचारिकेने निरोप दिल्यानंतर अर्ध्या तासांनी त्या तेथे पोहोचल्या. तोपर्यंत अनामिकेने प्राण सोडला. ही बाब युवासेनेला कळताच शिवसेनेचे गणपत लेडांगे, युवा सेनेचे ललित लांजेवार, प्रमोद मिलमिले, भाजपाचे तारेंद्र बोर्डे रूग्णालयात पोहोचले. नंतर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारदेखील तेथे पोहोचले. बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉ. कांबळे यांच्यावर कारवाई करेपर्यंत मृतदेहाचे विच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका तिचे आई-वडील व आमदारांनी घेतली. त्यासाठी आमदारांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राठोड यांना वणीत पाचारण केले.
यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राठोड सायंकाळी ७ वाजता रूग्णालयात दाखल झाले. तोपर्यंत घटनेच्या वेळी वैद्यकीय अधिकारी रूग्णालयात उपस्थित नसल्याने बालिकेचा मृत्यू झाला, असे लेखी बयाण अधीक्षक डॉ.चंद्रशेखर खांबे यांनी दिले. त्यानंतर आमदार, युवासेना व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी नऊ तास ग्रामीण रूग्णालयात ठिय्या मांडला. त्यांनी डॉ.माधुरी कांबळे यांना निलंबनाची मागणी केली.आमदार व डॉ.राठोड यांनी आरोग्य उपसंचालक व जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर डॉ.कांबळे यांची चौकशी करून त्यांना निलंबित केले जाईल. चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, असे लेखी आश्वासन रात्री १० वाजता देण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
वडिलांनी केली पोलिसांत तक्रार
मृतक अनामिकेचे वडील सुनील कोटरंगे यांनी याप्रकरणी वणी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रारीतून संबंधित डॉक्टरविरूद्ध सदोष मनुष्य वधाा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र वैद्यकीय सूत्रांचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल, असी ठाणेदार अस्लम खान यांनी स्पष्ट केले आहे.