विहिरी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा
By Admin | Updated: May 16, 2015 00:12 IST2015-05-16T00:12:29+5:302015-05-16T00:12:29+5:30
सिंचन विहिरी पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करा. यात हयगय केल्यास कारवाई करण्यात येईल, ...

विहिरी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा
सचिवांचे निर्देश : राळेगाव येथे घेतला विविध योजनांचा आढावा, जागृतीवर भर
राळेगाव : सिंचन विहिरी पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करा. यात हयगय केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनविभागाचे प्रधान सचिव तथा राळेगाव उपविभागाचे विशेष अधिकारी विकास खारगे यांनी दिला आहे. त्यांनी शुक्रवारी येथील उपविभागीय कार्यालयात विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून विविध योजनांचा आढावा घेत दिशानिर्देश केले. यावेळी आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, उपविभागीय अधिकारी जे.आर. विधाते, कळंबचे तहसीलदार संतोष काकडे यासह राळेगाव आणि कळंब तालुक्यातील विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
तब्बल चार तास ही बैठक चालली. ग्रामस्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीचा एक निश्चित दिवस व वेळ निश्चित करून शेतकऱ्यांकरिता जागृती आणि विविध अभियानाची माहिती दिली जाणार आहे. येत्या १० जूनपर्यंत पात्र शेतकऱ्यांना बँकांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. बेंबळा कालवे प्रकल्पाच्या वितरिका, उपवितरिका पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांच्या सिंचन विहिरी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले गेले आहे. कृषी विभागाच्या जलशिवार योजना पावसाळ्यापूर्वी पूर्ण केल्या जाईल. शेतीला जोडधंदा म्हणून विविध उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आरोग्यविषयक सेवा शेतकरी व ग्रामस्थांना उपलब्ध करून दिल्या जाईल. शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जागृतीवर भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांचे समूपदेशन, पथनाट्याद्वारे शासनाचा संदेश गावोगावी पोहोचविला जाणार आहे. शाळा, महाविद्यालय सुरू झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून व्याख्यानाद्वारे जागृती केली जाणार असल्याचे सचिव खारगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सचिव खारगे गुरुवारी रात्री येथे मुक्कामी होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी प्रथम गुजरी आणि त्यानंतर कळंब तालुक्याच्या सावरगाव येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली. आत्महत्येची कारणे जाणून घेतली. उपविभागीय कृषी अधिकारी पी.जी. नाईक, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता एस.एम. राघमवार, तालुका कृषी अधिकारी एन.आर. कुंभरे, कळंबचे गटविकास अधिकारी एम.व्ही. नाल्हे, पंचायत समिती सभापती बेबीताई जवादे, उपसभापती सुरेश मेश्राम, कळंबच्या सभापती वर्षा वासेकर, उपसभापती विजय गेडाम, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता वाय.एल. लाखानी, सहायक निबंधक आर.एन. मदारे, राळेगावचे ठाणेदार पी.डी. डोंगरदिवे आदी यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
घाटंजीत मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
घाटंजी : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात मुख्य सचिव भास्कर देशमुख यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. यावेळी काही लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. ते कसे सोडविता येईल याकडे लक्ष घालावे, असे सूचविण्यात आले. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, या व इतर बाबी सचिव देशमुख यांनी यावेळी उपस्थितांकडून जाणून घेतल्या. जलयुक्त शिवार यासारख्या योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजनेतून विनाविलंब कामे सुरू करून ती पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी शेतकरी आत्महत्यांची कारणे आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना सुचविल्या. जिल्हा परिषद सदस्य उषाताई राठोड यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. माजी पंचायत समिती सदस्य सहदेव राठोड यांनीही शेतकऱ्यांच्या समस्या सांगून त्या कशा सोडविता येतील याकडे लक्ष घालावे, अशी विनंती केली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी अपार, तहसीलदार एम.एम. जोरवर, तालुका कृषी अधिकारी माळोदे, वनविभागाचे अमर सिडाम, गटविकास अधिकारी उत्तम मनवर, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, पंचायत समिती सभापती शैलेश इंगोले उपस्थित होते. सचिवांनी काही ठिकाणच्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणी केली. (प्रतिनिधी)