सिंचन विहिरी वेळेत पूर्ण करा
By Admin | Updated: June 1, 2015 00:18 IST2015-06-01T00:18:26+5:302015-06-01T00:18:26+5:30
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तुलनेत रबी व उन्हाळी पिकाखालील क्षेत्र अतिशय कमी आहे.

सिंचन विहिरी वेळेत पूर्ण करा
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : विहिरींचा तालुकानिहाय आढावा
यवतमाळ : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तुलनेत रबी व उन्हाळी पिकाखालील क्षेत्र अतिशय कमी आहे. शेतकऱ्यांकडे सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध नसल्याचा हा परिणाम आहे. इतर हंगामातही पिके घेण्यासाठी सिंचन विहिरी फार उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू आणि मंजूर असलेल्या सर्व सिंचन विहिरी वेळेत पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केल्या.
बचत भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी धडक सिंचन विहीर तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत सिंचन विहीरींचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला, दीपककुमार मिना, रोहयो उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी फडके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र जवळपास साडेसात लाख हेक्टर इतके आहे. त्यातुलनेत रबीचे क्षेत्र चांगले असणे अपेक्षित असताना ते केवळ ९० हजार हेक्टरच्या आसपास आहे. शेतकऱ्यांनी दोन ते तीन पिके घेतल्यास त्यांच्या हातात चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे केवळ खरीपातील मान्सूनच्या पावसावर अवलंबून न राहता इतरही पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात धडक सिंचन व नरेगाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विहिरी त्यासाठी तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात सद्या सुरू असलेल्या विहिरी पूर्ण झाल्या तरी बराच फरक पडू शकतो. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विहिरी पूर्ण करण्यासाठी जातीने लक्ष घालावे, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय सिंचन विहिरींचे उद्दिष्ठ व बांधलेल्या विहिरींचा तसेच बांधकामाधिन विहिरींचा आढावा घेतला. तालुकानिहाय आढावा घेताना विभागनिहाय आढावाही त्यांनी घेतला. ज्या विभागाचे काम समाधानकारक आढळून आले नाही, अशांना जिल्हाधिकाऱ्यांनी धारेवर धरले. यावेळी रोहयोचे उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी बैठकीत माहिती सादर केली. बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बांधकाम, सिंचन व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)