‘सर्वसेवा’ प्रकरणात तक्रारींचा ओघ
By Admin | Updated: May 9, 2015 00:08 IST2015-05-09T00:08:49+5:302015-05-09T00:08:49+5:30
येथील सर्वसेवा व्यापारी संकूल सहकारी पतसंस्थेतील गैरप्रकार गुरुवारी चव्हाट्यावर आल्यानंतर ठेवीदारांनी

‘सर्वसेवा’ प्रकरणात तक्रारींचा ओघ
ठेवीदारांची फसवणूक : आणखी चौघांच्या तक्रारी दाखल, चार दिवसांची पोलीस कोठडी
यवतमाळ : येथील सर्वसेवा व्यापारी संकूल सहकारी पतसंस्थेतील गैरप्रकार गुरुवारी चव्हाट्यावर आल्यानंतर ठेवीदारांनी शुक्रवारीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. फसवणूक प्रकरणी तिघांनी वडगाव रोड ठाण्यात तक्रार नोंदविली असून आणखीही तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पतसंस्था अध्यक्षांसह तिघांना चार दिवसाची पोलीस कोठडी येथील न्यायालयाने दिली आहे.
येथील जाजू चौक स्थित सर्वसेवा व्यापारी संकूल सहकारी पतसंस्थेत ९३ लाख २८ हजार ५६० रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले होते. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. या पतसंस्थेत पैसे गुंतविणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक जण तक्रार करण्याच्या मानसिकतेत आहे. शुक्रवारी सोनाली सुरेश लोंदे, सुनंदा सुरेश लोंदे रा. वेदधारिणीनगर यांनी एक लाख ६६ हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार वडगाव रोड ठाण्यात केली. या प्रमाणेच आणखी दोन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या दाखल करून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
फसवणूक प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम काकडे, सचिव अशोक पेटेवार, माजी अध्यक्ष शमशुद्दीन काझी यांना वडगाव रोड पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती. दरम्यान शुक्रवारी त्यांना येथील प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयापुढे हजर करण्यात आले. वडगाव रोड पोलिसांनी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून चौकशीसाठी आरोपींचा सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने या तिघांना १२ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
ठेवीचे पैसे परस्पर गुंतविल्याची चर्चा
ठेवीदारांच्या नेमक्या रकमा किती याचा तपास पोलीस करणार आहे. शिवाय पतसंस्थेचे संचालक मंडळ, तेथील कर्मचारी या सर्वांचा तपासादरम्यान जबाब घेतला जाणार आहे. ठेवीदारांची संख्या वाढत असल्याने अपहाराची रक्कमही कोट्यवधींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. या पतसंस्थेतील बरीच रक्कम परस्पर रियल इस्टेटच्या व्यवसायात गुंतविण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी संचालक मंडळातील व्यक्तीऐवजी हितसंबंध असलेल्या खासगीतील व्यक्तींच्या नावे ही मालमत्ता खरेदी करण्यात आल्याची चर्चा आहे. ठेवीदारांच्या रकमेतून घेतलेली मालमत्ता रेकॉर्डवर घेण्यासाठी पोलिसांना तपासाची व्याप्ती वाढवावी लागणार आहे. शहरातील एका ज्येष्ठ विधिज्ञाच्या नावे मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतविल्याची उघडउघड चर्चा आहे. अटकेची कारवाई झाल्यापासून आरोपींना भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात अनेकांनी पायधूळ झाडल्याची माहिती आहे. यात मोठे लाभार्थी गुंतले असल्याचे सिद्ध होते.