प्रशासनाविरुध्द राज्यपालांकडे तक्रार
By Admin | Updated: June 8, 2017 01:23 IST2017-06-08T01:23:11+5:302017-06-08T01:23:11+5:30
जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सभेत केवळ आपण केलेल्या तक्रारीवरील

प्रशासनाविरुध्द राज्यपालांकडे तक्रार
आदेशाची अवमानना : जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली परवानगी नाकारली
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सभेत केवळ आपण केलेल्या तक्रारीवरील कामकाज जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून रितसर परवानगी घेतल्यानंतरही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सभेला उपस्थित राहण्याची परवानगी नाकारून शासनादेशाचा अवमान केला, अशी तक्रार सेंटर फॉर अवेरनेस, जस्टिस अॅन्ड ह्युमन राईटस्चे संचालक प्रा. डॉ. प्रदीप राऊत यांनी राज्यपालांकडे केली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध केलेल्या तक्रारींचा समस्त नागरिकांना पाठपुरावा करता यावा व भ्रष्टाचार निर्मूलनार्थ लोकसहभाग वाढून तक्रारकर्त्याच्या मनात समितीच्या कार्यपद्धतीबद्दल साशंकता राहू नये, या हेतुने राज्यपाल यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे गठण करून कामकाजात पारदर्शकतेची ग्वाही दिली. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात रितसर परवानगी घेऊन सभेत आसनस्थ झालेल्या तक्रारकर्ते प्रा. डॉ. प्रदीप राऊत यांना काही वेळ बाहेरच थांबण्यास सांगून सभा संपल्यानंतर बोलाविण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मनमानीचा प्रश्न उपस्थित करून समितीचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शासनादेशाचा अवमान केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.