अधिक वयाची खेळाडू खेळविल्याची तक्रार
By Admin | Updated: August 29, 2015 02:43 IST2015-08-29T02:43:08+5:302015-08-29T02:43:08+5:30
येथील नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या सामन्यात कोषटवार विद्यालय पुसदच्या संघाने १५ वर्षाच्या खेळाडूला खेळविल्याची तक्रार..

अधिक वयाची खेळाडू खेळविल्याची तक्रार
शालेय क्रीडा स्पर्धा : एकाच खेळाडूंचे तीन वेगवेगळे जन्मवर्ष
यवतमाळ : येथील नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या सामन्यात कोषटवार विद्यालय पुसदच्या संघाने १५ वर्षाच्या खेळाडूला खेळविल्याची तक्रार यवतमाळच्या पोदार स्कूल संघाच्या क्रीडा शिक्षकाने केली आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा सुरू आहेत. २४ आॅगस्टला १४ वर्षाआतील मुलींच्या फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली. अंतिम फेरीत कोषटवार दौलतखान विद्यालय पुसद आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल यवतमाळ संघांनी प्रवेश केला. अंतिम सामन्यात पुसद संघाने २-० गोलने विजय प्राप्त केला. दरम्यान पोदार स्कूल संघाने पुसदच्या संघातील रेवती संतोष कोकारे या खेळाडुंची जन्मतारिख चुकीची असल्याची रितसर तक्रार स्पर्धा आयोजकांकडे केली. कोकारे ही खेळाडू नुकत्याच झालेल्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत राज्यस्तरावर खेळली. या स्पर्धेत तिची जन्मतारिख १५ मे २००० आहेत तर याच वर्षीच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत २००३ हे जन्मवर्ष तर गतवर्षीच्या जिल्हा स्पर्धेत २००२ हे जन्मवर्ष असल्याचे प्रमाणपत्र कोषटवार विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल जोशी यांच्या स्वाक्षरीसह प्रमाणित करून दिले आहे. शिवाय याच प्रमाणपत्राच्या आधारे २०१४ मध्ये तत्कालिन प्रभारी क्रीडा अधिकारी अशोक खंडारे व २०१५ मध्ये अविनाश पुंड या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनीही स्वाक्षरी करून संघाची यादी प्रमाणित केली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोषटवार विद्यालय पुसद यांच्या कागदपत्राच्या आधारे पोतदार संघाने तक्रार दिली आहे. तीन वेगवेगळे बोगस जन्मवर्ष दाखवून पुसद संघाने शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे संबंधित संघावर कार्यवाही करून आमच्या संघाला विजयी घोषित करावे, अशी मागणी पोतदार संघाने तक्रारीत केली आहे. तुर्तास दाखल झालेल्या तक्रारीवर क्रीडा कार्यालयाने निर्णय राखून ठेवला आहे.
जिल्हा शालेय स्पर्धेत अनेक संघात आवश्यकतेपेक्षा अधिक वयाचे खेळाडु खेळविले जातात. संघातील खेळाडुंचे ओळखपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र तपासण्याची जबाबदारी क्रीडा कार्यालयाकडे आहे. मात्र कागदपत्रे अपवादानेच तपासले जात असल्याचे दिसून येते. (क्रीडा प्रतिनिधी)