अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांची सर्रास लूट

By Admin | Updated: June 24, 2015 00:14 IST2015-06-24T00:14:31+5:302015-06-24T00:14:31+5:30

अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट अजूनही थांबली नाही.

The common looters looted the farmers | अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांची सर्रास लूट

अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांची सर्रास लूट

अव्वाच्या सव्वा व्याज : कागदाच्या चिटोऱ्यावर लाखोंचा व्यवहार
कळंब : अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट अजूनही थांबली नाही. दुसरीकडे परवानाधारक सावकारही अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करत आहे. विशेष म्हणजे लाखो रुपयांचा हा व्यवहार केवळ कागदाच्या चिटोऱ्यावर सुरू आहे. यात शेतकऱ्यांची फसगत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कळंब तालुक्यात केवळ सात लोकांकडेच सावकारीचा परवाना आहे. यातील पाच ज्वेलर्स (सोने खरेदी-विक्री) चालविणारे आहेत. मात्र त्यांच्याशिवाय अनेकजण शेतकरी आणि इतरांच्या अडचणीचा फायदा घेऊन सावकारी करत आहे. ते सहा महिन्यासाठी सवाई ते दिडी अशी व्याजाची आकारणी करतात. वास्तविक सावकारांनी सोने तारण ठेवणाऱ्यांकडून दरसाल दर शेकडा १५ तर इतरांकडून वार्षिक १८ टक्केच्या वर व्याज आकारायला नको. परंतु परवानाधारक सावकारही शासकीय नियमाने लोकांना कर्जाऊ रक्कम द्यायला तयार नाही, ही वास्तविकता आहे.
शासकीय नियमाने परवानाधारक सावकारांनी बिगर शेतकऱ्यांना १५ ते १८ टक्केच्या दरम्यानच व्याज आकारायला पाहिजे. तसेच तारण ठेवणाऱ्यांकडून १५ तर विनातारण ठेवणाऱ्यांकडून १८ टक्केच्या वर व्याज घेणे नियमबाह्य आहे. तसेच तारण ठेवणाऱ्या शेतकऱ्यांकडून नऊ ते तारण न ठेवणाऱ्या शेतकऱ्यांकडून १२ टक्केच्यावर व्याज घेणे नियमबाह्य आहे. परंतु सर्रासपणे भरभक्कम व्याज लाऊन लुटीचे प्रकार सुरू आहे.
बँकेमध्येही सोने तारण ठेऊन कर्ज दिले जाते. परंंतु अशिक्षित आणि खेड्यातील नागरिक ज्वेलर्सकडेच सोने गहाण ठेवतात. यामध्ये ते बहुतेकवेळा नाडवले जातात. येथील अनेक ज्वेलर्स संचालकांचा व्यवहार सराफाआड सावकारीचा आहे. यावर कोणाचाही अंकुश नसल्याने मनमानी व्याज आकारले जाते. विशेष म्हणजे हा व्यवहार कागदाच्या चिटोऱ्यावर केला जातो. बहुतेक लोकांना पक्की पावती दिली जात नाही. अशा दुकानांची तपासणी केल्यास मोठा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणार नाही. त्या दृष्टीने संबंधित प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)

नियमबाह्य व्याज आकारणाऱ्यांवर कारवाई होणार
परवानाधारक सावकारांनी शासकीय नियमाप्रमाणेच व्याज आकारून कर्ज दिले पाहिजे. सर्वांनी पक्क्या पावत्यांवरच पैशांचा व्यवहार करावा. जास्तीचे व्याज अथवा नियमबाह्य कामे करणाऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहकार अधिकारी राजेश गुजर यांनी दिली.

Web Title: The common looters looted the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.