शेतकरी विधवांनी केले प्रतिमेचे दहन

By Admin | Updated: May 11, 2015 01:48 IST2015-05-11T01:48:00+5:302015-05-11T01:48:00+5:30

आदिवासी शेतकऱ्यांच्याही आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. मात्र राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी आदिवासी शेतकरी आपल्या तणावात संघर्ष करतात ...

Combustion of the image made by the widows of widows | शेतकरी विधवांनी केले प्रतिमेचे दहन

शेतकरी विधवांनी केले प्रतिमेचे दहन

यवतमाळ : आदिवासी शेतकऱ्यांच्याही आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. मात्र राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी आदिवासी शेतकरी आपल्या तणावात संघर्ष करतात मात्र आत्महत्या करीत नाही, असा दावा केला. या प्रकाराचा निषेध म्हणून रविवारी पांढरकवडा येथे शेतकरी विधवांनी त्यांच्या प्रतिमेचे प्रतिकात्मक दहन केले.
यवतमाळ जिल्ह्यातच आदिवासी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणे आहेत. राज्यभरातील हा आकडा मोठा आहे. तरीही कृषिमंत्र्यांकडून या शेतकऱ्यांबाबत असे वक्तव्य करणे योग्य नसल्याचे विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष तथा या आंदोलनाचे संयोजक किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.
विदर्भात मागील दशकात झालेल्या ११ हजारावर शेतकरी आत्महत्यांमध्ये ५० टक्के शेतकरी आदिवासी, दलित आणि भटक्या जमातीचे आहेत. बँकांनी कर्ज नाकारल्यामुळे तसेच कृषी मालाला भाव न मिळाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा सरकारी अहवाल आहे. असे असतानाही ना. खडसे यांनी आदिवासी शेतकरी आत्महत्या करीत नसल्याची खोटी माहिती दिल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. केंद्रात भाजपाचे सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्राच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना थकीत पीक कर्जामधून मुक्ती देण्यासाठी सातबारा कोरा करण्याचे अभिवचन वारंवार देण्यात आले होते. याचा सरकारला विसर पडला असल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. याप्रसंगी विदर्भ जनआंदोलन समितीचे सचिव मोहन जाधव यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने हमी भावात वाढ, पीक कर्ज माफी द्यावी, अशी मागणी विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या नेत्या बेबीताई बैस यांनी यावेळी केली.
भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली नाही. तसेच बँकांनी कर्जाचे पुनर्वसन आजपर्यंत केले नाही. कापसाचे हमी भाव तसेच आले. पैशांअभावी पेरणीची तयारी थांबली आहे. यानंतरही सरकार मदतीसाठी तयार नाही. अशातच कृषिमंत्र्यांनी केलेले हतबलतेचे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करून निषेध नोंदविण्यात आल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले. यावेळी तालुक्यातील शेतकरी विधवा आणि शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (वार्ताहर)

Web Title: Combustion of the image made by the widows of widows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.